Friday, June 2, 2023

बीबीएफ पध्‍दतीने पिकांच्‍या लागवडीमुळे उत्पादन वाढ होते ....... डॉ. गजानन गडदे

मौजे धार येथे खरीप पुर्व शेतकरी बैठक संपन्‍न 

रिलायन्स फाउंडेशन, परभणी आत्‍मा आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक ३१ मे रोजी मौजे धार (ता. जि. परभणी) येथे खरीप पूर्व शेतकरी बैठक घेण्यात आली. बैठकीत कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे आणि परभणी आत्माच्‍या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती. स्वाती घोडके यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात डॉ. गडदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी बीबीएफ पद्धतीने करणे गरजेचे आहे, या पद्धतीमुळे पिकाची वाढ जोमाने होते, पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत एकरी बियाणे कमी लागते. मूलस्थानी जलसंवर्धन होते तर अधिक पाऊसात सरीतुन पाण्‍याचा निचरा होतो. पिकांच्‍या उत्पादनात २० - २५ टक्के वाढ होते. डॉ गडदे यांनी सोयाबीनची बीजप्रक्रिया, खत  व तण व्यवस्थापन, शंखी गोगलगाय व्यवस्थापन आदी  विषयावर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या कृषि विषयक शंकेचे निरासरण केले. श्रीमती स्वाती घोडके यांनी माती परीक्षणाचे महत्त्व सांगुन माती नमुने घेण्याची पद्धत, सोयाबीन उगवण क्षमता तपासणी, पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्‍याची पध्‍दत याविषयी मार्गदर्शन केले. बैठकीस गावातील आत्मा अंतर्गत गटातील शेतकरी तसेच इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता रिलायन्स फाउंडेशनचे श्री.रामा राऊत आणि विद्यापीठाचे श्री नितीन मोहिते यांनी परिश्रम घेतले.