Saturday, March 2, 2024

परभणी कृषि विद्यापीठाच्‍या संशोधन कार्यात डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांचे मोलाचे योगदान..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवितील डॉ. दत्तप्रसाद वासकर यांचा संचालक संशोधन म्हणून यशस्वी कार्यकाळ 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर हे दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सेवानिवृत्‍त झाले. त्‍यानिमित्‍त संशोधन संचालनालयाच्या वतीने दिनांक १ मार्च रोजी निरोप समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते. व्‍यासपीठावर संचालक विस्तार शिक्षण डॉ‌ धर्मराज गोखले, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, नवनियुक्त संचालक शिक्षण डॉ. जगदीश जहागीरदार, सौ. सुवर्णा वासकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी निरोप समारंभ हा आनंददायी दुःखदायी असा संमिश्र स्वरूपाचा आहे असे बोलून डॉ. दत्तप्रसाद वासकर यांची पदव्‍युत्‍तर विद्यार्थीदशेपासूनच ओळख असल्याचे सांगितले व पूर्वीचे अनुभव नमूद केले. डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी विद्यापीठाच्‍या संशोधन कार्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी विद्यापीठांस आपले मानले आणि कार्य करताना सर्व बाबींमध्ये समतोल ठेवला, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांचा निरोप समारंभामध्ये विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या पुष्पवर्षा केला, यातुनच त्‍यांच्‍या कार्याची प्रचिती येते. बुद्धीला चालना देऊन दीर्घायुष्य लाभते, तेव्हा आपल्या उत्तम बौद्धिक गुणाचा वापर भविष्यात करून समाज उपयोगी कार्य आपल्या हातून घडो आणि दीर्घायुष्य लाभो अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत असलेल्या कुटुंबांना आणि त्यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यकाळ व आयुष्यमान यशस्वी होवो अशा शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, विद्यापीठात कार्य करत असताना कोणत्याही कार्याचा गर्व केला नाही तर तो एक छंद म्हणून जोपासला. संचालक संशोधन कार्याचे केवळ नेतृत्व केले आणि मिळालेल्या यशाचे श्रेय अधिनिस्थ सर्व अधिकाऱ्यांना आणि संशोधकांना दिले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी एकूण ३४ पुस्तके प्रकाशित केली, याद्वारे साडेचार लाख विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केली. याबद्दल  मुक्त विद्यापीठाने प्रमाणपत्र देऊन सन्मान केल्याचेही नमूद केले. वेळेचे बंधनाचे सतत पालन केले आणि ही सवय माझ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुरु यांच्याकडून मिळाल्याचे नमूद केले. तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्य करत असतानाचा आलेला संपूर्ण अनुभव कथन करून दोन्ही विद्यापीठाचे आणि विद्यापीठ प्रशासनाप्रती समाधान मानून ऋण व्यक्त केले.

याप्रसंगी विद्यापीठातील डॉ. धर्मराज गोखले, डॉ. उदय खोडके, डॉ. जगदीश जहागीरदार, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. शिवाजी मेहेत्रे, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. विश्वास खंदारे, डॉ. निता गायकवाड आणि डॉ. गोदावरी पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांच्यासोबत आलेले कामासोबतच सहवासात आलेल्या अनुभवाचे कथन केले आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे गुण गौरव करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  श्री. ऋषिकेश औंढेकर यांनी केले तर आभार डॉ. मदन पेंडके यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.




डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या संचालक संशोधन कार्यकाळाचा आढावा

डॉ. दत्तप्रसाद प्रभाकर वासकर यांनी ऑगस्ट 2013 मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संचालक संशोधन या पदाचा कार्यभार स्वीकारला. दि. 29  फेब्रुवारी, 2024 रोजी नियत वयोमानानुसार जवळपास 11 वर्षाच्या संचालक संशोधन पदाच्या यशस्वी सेवेनंतर निवृत्त होत आहेत. यापुर्वी त्यांनी राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या या पदावर 1989 साली सेवारंभ केला. सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत असतांना भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, कृषि मंत्रालय, भारत सरकार या संस्थांकडुन अर्थसहाय्यीत तदर्थ संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले. सन 1998 साली सहयोगी प्राध्यापक पदावर नामनिर्देशनाने नेमणुक झाली. अखिल भारतीय कोरडवाहु फळ संशोधन प्रकल्पामध्ये कार्यरत असतांना डाळिंबाच्या फुले भगवा या वाणाची निर्मिती, प्रचार आणि प्रसार केला. डाळिंब उत्पादक शेतक­यांमध्ये अतिशय लोकप्रिय असा हा वाण आजसुध्दा शेतक­यांच्या आर्थिक उन्नतीस कारणीभुत ठरला आहे. फुले भगवा या वाणाने डाळिंबाच्या एकुण क्षेत्राच्या 86 टक्के क्षेत्र व्याप्त केले आहे. याची विषेश नोंद भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभाग आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त प्रकाशनामध्ये घेण्यात आली आहे. 

संचालक संशोधन म्हणून डॉ. वासकर यांच्या अधिनीत संपूर्ण मराठवाड्यात पसरलेली भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत येणा­या एकूण 23 संशोधन योजना, राज्य शासनाची एकूण 17 संशोधन केंद्रे कार्यरत होती. या संशोधन केंद्रांवर तांत्रिक कार्यक्रम राबविणे, गरजेवर आधारित संशोधन हाती घेणे व तंत्रज्ञ विकसित करणे, विकसित तंत्रज्ञानाचा प्रसार करणे इत्यादी कार्यासाठी मार्गदर्शन करणे या बाबींचा समावेश होतो. त्यांनी नवोन्मेषी संशोधनासाठी सदैव प्रोत्साहन दिले. त्‍यांच्‍या कार्यकाळात विद्यापीठाच्‍या वतीने विविध पिकांचे 42 वाण, 35 कृषि अवजारे आणि 315 तंत्रज्ञान शिफारशी प्रसारित करण्यात आल्या. उल्लेखनीय संशोधनात बीटी मका नवोन्मेषी संशोधनामध्ये 02 जनुकीय परिवर्तीत चाचण्या विद्यापीठ प्रक्षेत्रावर सन 2014 साली घेऊन शास्त्रज्ञांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन विद्यापीठ हे एका वेगळया उंचीवर स्थिर करण्यात कुशल नेतृत्व केले. कपाशीच्या नांदेड-44 या वाणाचे बीटीमध्ये रुपांतरण, ज्वारीचा परभणी शक्ती हा देशातील पहिला जैवसंपृक्त वाण, बाजरीचे एएचबी 1200 आणि एएचबी 1269 या दोन जैवसंपृक्त वाणांची निर्मिती यामध्ये प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला. तूर, सोयाबीन, जवस या पिकांमध्ये नवीन वाणांची निर्मिती तसेच बीजोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये भरीव वाढ करुन या वाणांचे बियाणे शेतक­यांना मोठया प्रमाणात उपलब्ध झाले. सन 2017 मध्ये डॉ. वासकर यांनी संयोजक म्हणुन ‘जागतिक तापमान वाढ : कृषि व जलसाठयांवर होणारे परिणाम’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आणि सन 2023 साली राष्ट्रीय बियाणे परिषदेचे यशस्वी आयोजन केले. डॉ. वासकर यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांचे सदस्य या नात्याने संशोधन कार्यात अनुभवसिध्द मार्गदर्शन केले. त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचा महात्वाकांशी बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये विविध पिकांचे केंद्रक, पैदासकार, पायाभूत, प्रमाणीत आणि सत्यतादर्शक बियाणे निर्मिती आणि त्याचा विविध संशोधन संस्था, बियाणे मंडळ, महाबीज, शेतकरी बंधू भगिनी यांना मोठा लाभ झाला. विद्यापीठ निर्मिती बियाण्यावर शेतकरी बंधू भगिनी यांचा मोठा विश्वास असून त्यासाठी मोठी मागणी आहे. सोयाबीन पिकाचे केंद्रक व पैदासकार बीजोत्पादन वाढविण्यासाठी डॉ. वासकर यांनी सोयाबीन संशोधन योजनेची व्याप्ती 3 हेक्टर वरून 70 हेक्टर पर्यंत वाढवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर येथे मराठवाड्यातील शेतक­यांसाठी किन्नो संत्रा लागवड करण्यात आली, त्याचा लाभ यापुढे शेतक­यांसाठी होणार आहे. मध्यवर्ती रोपवाटिका, परभणी येथे विविध पिकांचे कलमे, रोपे तर सीताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई येथे सीताफळ या फळपिकाची लाखो कलमे रोपे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. डॉ. वासकर यांच्या कार्यकाळात नियमितपणे विद्यापीठ स्तरावर संशोधन आढावा बैठका, कृषि संशोधन परिषद बैठका तर राज्यस्तरावर संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती च्या (2017 व 2021) बैठकांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. डॉ. वासकर यांच्या कार्यकाळात कपाशी पिकातील यांत्रिकीकरण सन 2014-16 मध्ये मोन्सँटो आणि न्यु हॉलंड कंपनी यांच्या साहाय्याने बीटी कपाशीचे वाण आणि 100 टक्के यांत्रिकीकरण, 50 टक्के यांत्रिकीकरण आणि शेतक­यांची प्रचलित पद्धत असे संशोधन प्रात्यक्षिक कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर येथे सलग तीन वर्षे घेण्यात आले. तसेच सन 2017 व 2018 मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर पीआय इंडस्ट्रीज या कंपनीच्या साहाय्याने 50 एकरांवर कपाशीतील शेंदरी बोंड आळीच्या नियंत्रणासाठी पीबी रोप तंत्रज्ञान प्रात्याक्षिक राबविण्यात आले.