Friday, March 22, 2024

जागतिक जल दिना निमित्त जलपूजन व जल जागृती कार्यक्रमाचे आयोजन

 पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवावे .... डॉ. उदय खोडके


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठतील सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे जागतिक जल दिना निमित्त जलपूजन व जल जागृती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २२ मार्च रोजी करण्यात आले. कार्यक्रमासाठी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके हे अध्यक्षस्थानी होते तर संचालक संशोधन डॉ.जगदीश जहागीरदार, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. मदन पेंडके, डॉ. सुमंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. उदय खोडके यांनी आधुनिक शेती फायदेशीर करण्यासाठी पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळयात साठवून वापरणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तद्नंतर संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार यांनी आधुनिक सिंचन प्रणालीचा अवलंब करून दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. कार्यक्रमात डॉ. मदन पेंडके, डॉ. सुमंत जाधव यांनी पाणी बचती बद्दल मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक डॉ. हरीश आवारी, यांनी केले तर आभार डॉ. विशाल इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिकेत वाईकर, युवराज भोगील यांनी प्रयत्न केले. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी आणि कृषि महाविद्यालय , उदगीर येथील विद्यार्थी तसेच पाणी व्यवस्थापन प्रकल्प, रेशीम व ऊतीविद संवर्धन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.