Friday, March 8, 2024

वनामकृवित मराठवाड्यातील कृषि विज्ञान केद्रांची कृती आराखडा कार्यशाळा संपन्न

 कृषि विकासामध्ये कृषि विज्ञान केद्रांची महत्वाची भूमिका..... कुलगुरू डॉ. इन्द्र मणि 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विस्तार शिक्षण संचालनालय आणि अटारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील कृषि विज्ञान केद्रांची कृती आराखडा कार्यशाळा ०७ मार्च रोजी संपन्न झाली. कार्यशाळेच्या उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
        अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी असे संबोधले की, कृषि आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये कृषि विज्ञान केंद्राची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकरी हा बियाणे पेरल्यापासून ते काढणीपर्यंत सर्व प्रकारे धोके पत्करून शेती करत असतो तेव्हा शेतकऱ्यांचे हे धोके कमी करण्यासाठी विविध मार्ग प्रात्यक्षिकाद्वारे कृषि विज्ञान केंद्रामार्फत सुचवावेत. पीक लागवडीतील खर्चाची बचत कार्बन बचत सारख्या योजना, याबरोबरच राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी सर्वतोपरी आराखडा त्यांना द्यावा आणि शेतकऱ्यांची सेवा प्राधान्याने करावी. कृषि विज्ञान केंद्राचे कार्य शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रसारित करावे असेही त्यांनी सुचवले.
        प्रस्ताविक संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले यांनी केले आणि कृषि विज्ञान केंद्रामार्फत उच्च मूल्य आधारित पीक पद्धतीतील वैविधता वाढवणे आवश्यक असल्याचे नमूद करून यासाठी हळद, अद्रक, मसाल्याची पिके, फळपीके, फुल पिके यांच्या लागवड तंत्रज्ञानाचा प्रात्यक्षिकाद्वारे प्रसार करावा तसेच कृषि विज्ञान केंद्राने केलेल्या कार्याचे मूल्यांकन करावे. याबरोबरच जिल्ह्यातील सर्व शासकीय,अशासकीय यंत्रणा आणि कृषि संबंधित यंत्रणा यांच्याशी समन्वय ठेवून शेतकऱ्यांपर्यंत विकसित तंत्रज्ञान पोहोचवावे असे प्रतिपादन केले.
        कार्यशाळेमध्ये वनामकृवि अंतर्गत मराठवाडा कार्यक्षेत्रातील सर्वच बाराही कृषि विज्ञान केंद्राने मागील वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल, शेतकऱ्याद्वारे आलेले प्रत्याभरणे आणि भविष्यातील कामाचा कृती आराखडा सादर केला. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेमध्ये विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. जया बंगाळे, डॉ. आर. बी. क्षीरसागर, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. व्ही. एस. खंदारे, डॉ. पी. एच. वैद्य, डॉ पी.आर. झंवर, डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. एस.एल. बडगुजर, शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे डॉ. बैनवाड, डॉ. कैलास गाडे, डॉ. सुरेश वाईकर या तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी पुढील वर्षातील कृती आराखड्यामध्ये आपल्या संबंधित विषयात आवश्यकतेनुसार सूचना दिल्या.
          कार्यक्रमाचे नियोजन संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. एस. व्ही. चिक्से, आणि प्रा. व्ही. बी. ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. कार्यशाळेमध्ये सर्वच कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक आणि विविध विषयाचे विषय विशेषज्ञ असे एकूण ७० सहभागी झाले होते.