Sunday, March 10, 2024

अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प अंतर्गत दैठणा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - कृषिरत महिला या योजनेद्वारे दैठणा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शेतकरी व विविध बचत गटातील महिलांना दिनांक ९ मार्च रोजी मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्ष्यस्थानी संशोधन प्रकल्पाच्या केंद्रीय समन्वयिका डॉ. सुनिता काळे या होत्या. त्यांनी शेतकरी महिलांना संशोधन प्रकल्पाची पूर्ण माहिती सांगून त्यांना शेतीकामातील श्रम कमी करण्याच्या विविध साधना बाबत मार्गदर्शन केले याबरोबरच शेतकरी महिलांना पोषण बाग तयार करून कुटुंबाची आवश्यक दैनंदिन पोषणाची पूर्तता करावी यासाठी प्रोत्साहित केले आणि भरडधान्य पासून विविध पदार्थ तयार करून शेतकरी महिलांना उद्योजकता विकसित करण्यासाठी प्रेरित केले. यावेळी प्रकल्पाच्या वरिष्ठ संशोधिका डॉ. नीता गायकवाड, उमेद अभियानाचे वरिष्ठ अविनाश राठोड, संदीप भोजने, अविनाश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

तदनंतर डॉ. नीता गायकवाड यांनी शेतकरी महिलांना उपजीविका सुरक्षा सविस्तर माहिती देऊन पोषण बागांमध्ये  पिकलेल्या भाज्यांचे सेवन शेतकरी कुटुंबांनी करून स्वतःचे व कुटुंबाचे पोषण सुधारणे गरजेचे आहे असे प्रतिपादन करून सक्षम असलेल्या महिलांचे कौतुक केले.

कार्यक्रमात उमेद अभियानाचे वरिष्ठ अविनाश राठोड आणि संदीप भोजने तसेच अविनाश राठोड यांनीही जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी व विविध बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प - कृषिरत महिला  मार्फत विकसित विविध चार्टचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यात हळद काढण्याचे साहित्य, कापूस वेचणी कोट, दुधाची घडवंची,त्रिशूल विळा,सुलभा बॅग,हातमोजे व तसेच विविध नैसर्गिक रंग, फवारणी कोट आणि भरडधान्य इत्यादी चार्ट प्रदर्शनास लावण्यात आले होते. या कार्यक्रमात यशस्वी महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी त्यांच्या उद्योगा विषयी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी योजनेअंतर्गत विकसित केलेल्या पोषण भागांना भेट दिली व त्यांची पाहणी करून विविध सूचना देण्यात आल्या.  कार्यक्रमाच्या दरम्यान यंग प्रोफेशनल - नवाल  चाऊस, संध्या शिंदे, आयोध्या गायकवाड, प्रसाद देशमुख यांनी  भरडधान्याचा वापर करावा पोषण विभागा अंतर्गत संशोधन पर विकसित पदार्थ करण्याचे प्रशिक्षण दिले. दैठणा गावातील एकूण शंभर शेतकरी महिलांनी कार्यक्रमात उत्साहात सहभाग नोंदविला.