वनामकृविच्या विद्यार्थ्यांचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली सहभाग
नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) व भारतीय कृषि संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय कृषि विद्यार्थी संमेलन” (National Agricultural Students' Sammelan) चे आयोजन दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम सी. सुब्रमण्यम सभागृह, एनएएससी संकुल, नवी दिल्ली येथे हायब्रीड मोड मध्ये पार पडला.
या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारचे केंद्रीय कृषि
व किसान कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार श्री शिवराज सिंह चौहान
आणि विशेष अतिथी म्हणून भारत सरकारचे कृषि व किसान कल्याण राज्य मंत्री माननीय
नामदार श्री. भागीरथ चौधरी, भारतीय कृषि संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक तथा
कृषि संशोधन आणि शिक्षण विभागाचे (DARE) सचिव माननीय डॉ.
मांगी लाल जाट आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात माननीय ना. श्री शिवराज सिंह चौहान, माननीय ना. श्री भागीरथ चौधरी तसेच माननीय डॉ. मांगी लाल जाट यांनी
विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या प्रसंगी देशभरातील कृषि विद्यापीठांमधील विद्यार्थी, संशोधक, वैज्ञानिक आणि कृषि शिक्षण क्षेत्रातील
तज्ज्ञ मोठ्या संख्येने प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन उपस्थित होते
यावेळी माननीय ना. श्री शिवराज सिंह चौहान यांनी
विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे स्वागत करत देशभरातील हजारो विद्यार्थ्यांशी संवाद
साधला. त्यांनी देशभरातील कृषि विद्यापीठांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचे कौतुक
केले. तसेच, शेती क्षेत्रात अजूनही अनेक आव्हाने असल्याचे
नमूद करत शेती ही अन्नसुरक्षा आणि आर्थिक विकासाचा पाया असल्यामुळे तिचे महत्त्व
अधोरेखित केले. या संदर्भात विद्यार्थ्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे
सांगून, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध उपाय
सुचविले. त्यांनी प्रत्येक विद्यापीठाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची गरज
व्यक्त केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुलभता
निर्माण होईल. तसेच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी
कौशल्यविकासावर भर देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभागाचे नियोजन वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
नेतृत्वाखाली आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ
सचिन मोरे यांनी केले.
यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा आचार्य पदवी
अभ्यासक्रमातील विद्यार्थी श्री. राहुल अशोक ठोंबरे यांना माननीय महोदयांशी ऑनलाईन
संवाद साधण्याची संधी मिळाली. ठोंबरे यांनी विद्यापीठाच्या यशोगाथेची माहिती देत
विद्यापीठातील पदभरती करण्याची विनंती केली. तसेच विद्यार्थ्यांसाठी योगा पार्क, खेळाचे मैदान, वसतिगृहाच्या सुविधा अशा आवश्यक सोयी
उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच एस.आर.एफ. (SRF) व जे.आर.एफ. (JRF) या संशोधन फेलोशिपच्या जागा
वाढवाव्यात, अशीही त्यांनी विनंती केली. तसेच नवी दिल्ली येथे
प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झालेल्या चार विद्यार्थ्यांसह विद्यापीठाचे
विद्यार्थी श्री. राहुल अशोक ठोंबरे यांनी अशा एकूण पाच विद्यार्थ्यांच्या वतीने
माननीय महोदयांशी संवाद साधत विविध विद्यार्थी हिताच्या मागण्या मांडल्या.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या माननीय कुलगुरूंच्या मीटिंग हॉलमध्ये तसेच विद्यापीठाच्या लातूर,
बदनापूर, आणि अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयामध्ये सदर कार्यक्रमाचे थेट
प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर
डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे,
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विविध
विभागाचे प्रमुख तसेच आचार्य व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे जवळपास २४० विद्यार्थ्यांनी
उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


.jpeg)
.jpeg)
.jpeg)