Friday, October 17, 2025

वनामकृविच्या नव्याने विकसित रब्बी ज्वारी वाण ‘परभणी सुपरदगडी (SPV 2735)’चे वितरण — उत्पादनक्षमतेकडे विद्यापीठाचा अभिनव टप्पा

 ‘प्रयोगशाळेतून शेतापर्यंत’ ध्येयाची ठोस अंमलबजावणी .... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ज्वारी संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेल्या नव्या रब्बी ज्वारी वाण ‘परभणी सुपरदगडी (SPV 2735)’ या वाणाचे २३० अद्यरेखा प्रात्यक्षिक संच (FLD) दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाडा विभागातील १२ कृषी विज्ञान केंद्रांना (KVKs) शेतकऱ्यांमध्ये वितरणासाठी देण्यात आले.

हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. लक्ष्मण जावळे, तसेच प्रगतशील शेतकरी व विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य श्री. जनार्दन आवरगंड आणि श्री. भीमराव डोंणगापुरे यांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी माननीय कुलगुरूंनी आपल्या मनोगतात म्हटले की, परभणी सुपरदगडी या नवीन वाणामध्ये उच्च उत्पादनक्षमता, गुणवत्तापूर्ण धान्यनिर्मिती व रब्बी हंगामातील अनुकूलता या तीनही गुणांचा समन्वय साधला आहे. या वाणाचा प्रसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे करून त्यांचे उत्पन्न वाढविणे, हा विद्यापीठाचा प्रमुख उद्देश आहे. संशोधनातून तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचविण्याचे हे पाऊल म्हणजे विद्यापीठाच्या ‘प्रयोगशाळेतून शेतापर्यंत’ या ध्येयाची ठोस अंमलबजावणी आहे.

सदर प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील २३० शेतकऱ्यांपर्यंत या वाणाचे बीज संच कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहेत. यामुळे रब्बी हंगामात उत्पादनात वाढ, दुष्काळसहिष्णुता, तसेच शेतकऱ्यांचा विश्वासार्ह उत्पन्नाचा पाया अधिक भक्कम होईल. ज्वारी संशोधन केंद्र, परभणीचे हे पुढाकार शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने एक नाविन्यपूर्ण आणि मार्गदर्शक पाऊल ठरले आहे.