वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय,
परभणी येथे आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव निवड चाचणी “कृषितरंग –
२०२५” या उपक्रमाचे भव्य आयोजन दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी
सकाळी १०.०० वाजता कृषि महाविद्यालय सभागृहात करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून, कार्यक्रमास मुख्य
कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती नतिशा
माथूर (भा.प्र.से.), जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री.
रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी (भा.पो.से.), तसेच माजी सनदी
अधिकारी व प्रसिद्ध सिनेअभिनेता माननीय श्री. अनिल मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून
उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव
श्री. संतोष वेणीकर आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांची मान्यवर
उपस्थिती लाभणार आहे.
“कृषितरंग” या युवक महोत्सवाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांच्या
सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे हा असून, या
माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक, कलात्मक
आणि सर्जनशील कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ उपलब्ध करून
दिले जात आहे.
या कार्यक्रमात संगीत, नृत्य, नाटक, वाद्य
वादन, एकांकिका, चित्रकला, वक्तृत्व, वादविवाद, काव्यपठण
आदी विविध सांस्कृतिक आणि कलात्मक स्पर्धांमध्ये या विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील
विद्यार्थी उत्साहाने सहभाग घेणार आहेत. या स्पर्धांमधून निवड झालेल्या विजेत्या
स्पर्धकांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात
दिनांक ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित “इंद्रधनुष्य – २०२५-२६” या २१ व्या
महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवक महोत्सवात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व
करण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब
भाग्यवंत, शैक्षणिक प्रभारी डॉ. रणजित चव्हाण, आणि सांस्कृतिक कार्यक्रम सचिव डॉ. नरेंद्र कांबळे यांनी नियोजन आणि
अंमलबजावणीचे कार्य प्रभावीपणे पार पाडले आहे.
“कृषितरंग – २०२५” या महोत्सवातून विद्यापीठातील युवा
प्रतिभांना नवसंजीवनी मिळून, त्यांच्या कलात्मकता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणांना नवी दिशा मिळेल, असा
विश्वास आयोजक मंडळाने व्यक्त केला आहे.
.jpeg)
