Wednesday, October 8, 2025

वनामकृविच्या किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत ‘जागतिक कापूस दिन’ साजरा

 कपाशीमध्ये कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी घनपद्धती लागवड आवश्यक – डॉ. अशोक जाधव


कापूस हे जगभरातील एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक असून त्याची लागवड अनेक देशांमध्ये केली जाते. कापूस ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देतो तसेच लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा प्रदेशाच्या अर्थकारणात कापूस पिकाला अनन्यसाधारण स्थान आहे.

कापूस पिकाच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्वाकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी ७ ऑक्टोबर हा दिवस जागतिक कापूस दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कापूस पिकाची शास्त्रीय लागवड, व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीच्या विविध उपायांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. यामुळे केवळ उत्पादनात वाढ होत नाही तर उत्पादन खर्चातही लक्षणीय घट होते, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळतो.

या पार्श्वभूमीवर किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्प (IRM), कापूस संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या तर्फे मौजे खांबेगाव, ता. पूर्णा, जि. परभणी येथे जागतिक कापूस दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

या वर्षी हा प्रकल्प विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यातील आर्वी, खानापूर, दैठणा (ता. परभणी) तसेच खांबेगाव व माखणी (ता. पूर्णा) या पाच गावांमध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक गावातील १२ शेतकऱ्यांच्या (एकूण ६० शेतकरी) शेतावर कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांना जैविक कीटकनाशके, ट्रायकोकार्डस, कामगंध सापळे, चिकट सापळे आणि रासायनिक कीटकनाशके यांसारख्या निविष्ठा वाटप करण्यात आल्या आहेत.

दि. ७ ऑक्टोबर रोजी मौजे खांबेगाव येथे प्रकल्पातील शेतकऱ्यांसाठी गटचर्चा व प्रक्षेत्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात कापूस संशोधन योजना, वनामकृवि, परभणी यांचे प्रभारी अधिकारी तथा कापूस कृषि विद्यावेत्ता डॉ. अशोक जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी कापूस लागवड करताना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याकडे लक्ष केंद्रित करावे. विद्यापीठाने शिफारस केलेल्या ३ बाय १ या घनपद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ साधता येते. तसेच विद्यापीठाने शिफारस केलेल्या विविध वाणांची लागवड करणे, शेंडा खुडणे, गळफांद्यांची छाटणी आणि योग्य खत व्यवस्थापन या उपायांनी उत्पादनक्षमता वाढते, असे त्यांनी सांगितले. डॉ. जाधव यांनी पुढे सांगितले की, विद्यापीठाने विकसित केलेले बीटी तंत्रज्ञान आता सरळ वाणांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या वाणांची लागवड करून अधिक उत्पादन मिळवावे. तसेच अतिवृष्टीनंतर येणाऱ्या रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी करताना वापसा झाल्यानंतरच फवारणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

यानंतर प्रकल्प समन्वयक तथा सहाय्यक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट केले. अतिवृष्टीनंतर कपाशीमध्ये दिसणाऱ्या बुरशीजन्य रोगांपैकी आंतरिक व बाह्य बोंडसड या रोगांबाबत सविस्तर माहिती देत त्यांनी योग्य बुरशीनाशक फवारणीचे महत्त्व अधोरेखित केले. विनाकारण फवारण्या टाळल्यास उत्पादन खर्च कमी होतो, असेही त्यांनी नमूद केले.

फवारणी करताना कीटकनाशकांची निवड ही शिफारशीप्रमाणेच आणि केवळ विश्वासार्ह कंपन्यांचीच करावी, जेणेकरून अपेक्षित परिणाम मिळतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच फवारणीवेळी काळजी घेणे, कपाशीची फरदड टाळणे आणि गुलाबी बोंड अळीचे योग्य व्यवस्थापन करणे याविषयीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माखणी येथील प्रगतशील शेतकरी श्री. जनार्दन आवरगंड, तसेच खांबेगाव येथील श्री. माधव दुधाटे, श्री. अच्युतराव कदम, श्री. सुरेश शृंगारपुतळे, श्री. रामचंद्र भोसले, श्री. अंबादास कदम, श्री. राषद शेख, श्री. सुदाम कदम, श्री. बाळासाहेब कदम, श्री. विष्णू कदम पाटील, श्री. गोपाळ पावडे, श्री. रसूल सय्यद, श्री. ज्ञानोबा जोंधळे, श्री. मगदूम पठाण, श्री. पांडुरंग चौरे, श्री. गजानन गव्हाले आदींसह गावातील ४० पेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान प्रगतशील शेतकरी श्री. अंबादास कदम यांच्या कापूस प्रक्षेत्राची पाहणीही करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री. इरफान बेग आणि तांत्रिक सहाय्यक श्री. नारायण ढगे यांनी परिश्रम घेतले.