Friday, October 31, 2025

शेतकऱ्यांनी वनामकृवि विकसित बैलचलित सुधारित अवजारांचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये करून उत्पादन खर्च कमी करावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण” या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सुधारित बैलचलित व मनुष्यचलित शेती अवजारे तसेच यंत्रांचे वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री. भागवत देवसरकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार तसेच निमंत्रित म्हणून सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य आणि शास्त्रज्ञ डॉ. हरीश उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेतकऱ्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित अवजारांचा सेंद्रिय शेतीत व्यापक वापर करावा. या अवजारांमुळे श्रम व वेळ दोन्हीची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, उत्पादन खर्च कमी होईल आणि शेती अधिक कार्यक्षम बनेल. त्यांनी पुढे सांगितले की, सेंद्रिय शेती ही केवळ पर्यावरणपूरक नव्हे, तर भविष्यातील टिकाऊ शेतीचा पाया आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना  ‘सुपर मोती’ ज्वारी वाणाची लागवड या अवजारांच्या साहाय्याने करावी, ज्यामुळे उत्पादनात गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढतील, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री. भागवत देवसरकर यांनी या अवजारे वाटप उपक्रमाचे कौतुक करून सांगितले की, विद्यापीठाच्या संशोधनातून तयार झालेल्या या नवकल्पनांचा शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतीत वापर केल्यास मराठवाडा प्रदेशातील कृषि उत्पादनात नक्कीच क्रांती घडेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले की, विद्यापीठाने विकसित केलेली अवजारे केवळ वापरणेच नव्हे, तर ती योग्य तांत्रिक पद्धतीने आणि काटेकोरपणे वापरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर सर्व शेतीकामे पूर्ण करण्याचे आणि पिक व्यवस्थापनात शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी हेही सांगितले की, वेळेवर आणि योग्य पद्धतीने केलेले नियोजन हेच उत्पादनवाढीचे गमक आहे.

प्रस्ताविक योजनेचे संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांनी केले. त्यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे लिंगापूर येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील बारा शेतकरी कुटुंबांना ३६ प्रकारची एकूण १३३ सुधारित बैलचलित व मनुष्यचलित शेती अवजारे आणि यंत्रे वाटप करण्यात आली. तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या सुपर मोती’ या ज्वारी वाणाचे बीजही शेतकऱ्यांना देण्यात आले.

वाटप केलेल्या अवजारांमध्ये — हळदीस माती लावणारे अवजार, धसकटे गोळा करणारे अवजार, उसास माती लावण्यासाठी सरी यंत्र, हात कोळपे, सायकल कोळपे, टोकन यंत्र, कडबा कुट्टी, पीठ गिरणी, शेवया यंत्र, फळे काढणी अवजार, हस्तचलित कात्री, तुरीचे शेंडे खुडणी यंत्र इत्यादींचा समावेश आहे.
डॉ. टेकाळे यांनी अवजारांच्या तांत्रिक वापराबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, या सुधारित अवजारांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च २० ते २५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो तसेच उत्पादकता वाढविता येते.

या प्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. रघुनाथ जायभाय व प्रा. दत्ता पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योजनेतील इंजी. अजय वाघमारे, इंजी. दीपक राऊत, इंजी. पूर्णिमा राठोड, प्रदीप मोकाशी, दीपक यंदे आणि मंगेश खाडे यांनी परिश्रम घेतले.