Monday, October 6, 2025

कठीण प्रसंगातही धैर्य न हरवता सर्वोत्तम प्रयत्न करा — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माणसाचे व्यक्तिमत्त्व आणि त्याचा खरा विकास हा तो कठीण परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जातो यावर अवलंबून असतो. त्यामुळे कितीही बिकट प्रसंग आला तरी घाबरून न जाता, धैर्याने त्याचा सामना करून आपले सर्वोत्तम प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दिनांक ६  ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित दीक्षारंभ कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी अनेक राष्ट्रीय मानांकनांमध्ये वरच्या क्रमांकावर स्थान मिळवणाऱ्या आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ‘अ’ दर्जा प्राप्त अशा उत्कृष्ट कृषि विद्यापीठाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे, हे अभिमानास्पद आहे. या संधीचा योग्य उपयोग करून घ्या. फक्त पदवी मिळवणे हा उद्देश न ठेवता, एक आदर्श व्यक्ती बनण्याचा आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा ध्यास घ्या. विनम्रता विकसित होणे हे शिक्षणाचे पहिले फळ असायला हवे. ज्ञानामुळे विनम्रता येते, विनम्रतेमुळे पात्रता मिळते, आणि पात्रतेमुळे धन, समृद्धी व समाधान प्राप्त होते. मात्र या कोणत्याही गोष्टींमुळे अहंकार निर्माण होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. याबरोबरच त्यांनी जीवनाच्या प्रवासात अडचणी आल्याच पाहिजेत; परंतु त्या अडचणींना धैर्याने सामोरे जा. काही वेळ लागेल, पण त्यातून समाधान नक्की मिळेल, कारण प्रत्येक समस्येचे उत्तर वेळेच्या गर्भात दडलेले असते. नैतिकता आणि चरित्र याहून महत्त्वाचे जीवनात काहीच नाही. म्हणून विद्यार्थी जीवनात उत्तम आरोग्य, उत्कृष्ट विद्या आणि सशक्त व्यक्तिमत्त्व विकास यावर लक्ष केंद्रित करा, असे नमूद केले. शेवटी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, या जगाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्य करण्याची संधी मिळालेल्या कृषि क्षेत्रात प्रवेश मिळाल्याबद्दल आपण सर्व भाग्यवान आहात, असे उद्गार काढले.

या प्रसंगी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सुर्यकांत पवार, कृषि विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. दिप्ती पाटगावकर, विषयतज्ज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. संजुला भावर तसेच कृषि महाविद्यालय, लिहाखेडीचे प्राध्यापक डॉ. एस. व्ही. ढगे यांच्यासह इतर शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. एस. व्ही. ढगे यांनी केले.