Saturday, October 11, 2025

वनामकृविच्या मृद विज्ञान विभागात भारतीय मृद विज्ञान संस्थेच्या वतीने उत्कृष्ट प्रबंध सादरीकरण स्पर्धा संपन्न

 मृद विज्ञान विभागाच्या विद्यार्थी संशोधन क्षमतेला वाव देणारी प्रबंध स्पर्धा - विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या मृद विज्ञान विभागात नवी दिल्ली येथील भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या वनामकृवि शाखेच्या वतीनेदिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी उत्कृष्ट प्रबंध सादरीकरण स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय मृद विज्ञान संस्था, परभणी शाखेचे अध्यक्ष व विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आशित मंडल (भोपाळ), डॉ. आर. डी. चौधरी (भावनगर, गुजरात), आणि डॉ. व्ही. एस. पाटील (राहुरी कृषि विद्यापीठ) उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. हरिहर कौसडीकर यांनी करताना या स्पर्धेच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, सादरीकरण कौशल्य वृद्धिंगत करणे आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी त्यांनी परभणी शाखेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली.शेवटी त्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा या विद्यार्थ्यांना संशोधनाच्या नव्या वाटा दाखवतात आणि नवीन शास्त्रज्ञ घडविण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरतात, असे प्रतिपादन केले.

या स्पर्धेचे तज्ज्ञ परीक्षक म्हणून डॉ. आशित मंडल, डॉ. आर. डी. चौधरी आणि डॉ. व्ही. एस. पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे उच्च कौतुक करत त्यांना संशोधनातील सखोलता, भाषिक स्पष्टता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन राखण्याचे मार्गदर्शन दिले.

स्पर्धेत आचार्य पदवीच्या एका विद्यार्थिनीने आणि पदव्युत्तर पदवीच्या चार विद्यार्थ्यांनी आपापले प्रबंध सादर केले. सादरीकरणादरम्यान विद्यार्थ्यांनी मृद विज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन, प्रयोगात्मक निष्कर्ष आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा शिफारसी मांडल्या. या स्पर्धेचा निकाल मृद विज्ञानाच्या राष्ट्रीय परिसंवादामध्ये, जो लवकरच कोईम्बतूर, तामिळनाडू येथे आयोजित होणार आहे, त्या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे.

सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या वनामकृवि शाखेचे सचिव तथा मृदा शास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे यांनी करून दिला, तर आभार डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी मानले.

या प्रसंगी विभागातील प्राध्यापक डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वायकर, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. महेश देशमुख, डॉ. संतोष चिकसे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. स्वाती झाडे, डॉ. शिलेवंत तसेच आचार्य व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विभागातील सर्व प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि कर्मचारी यांच्यासह श्री. इंगोले, श्री. जोंधळे आणि श्री. साजिद यांनी परिश्रम घेतले.