Saturday, October 11, 2025

रब्बी हंगामाचे नियोजन विषयक “शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाइन कृषि संवाद” संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा निरंतर उपक्रम 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या यांच्या प्रेरणेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) यांच्या समन्वयातून शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाइन कृषि संवाद” या उपक्रमाचा ६७ वा भाग रब्बी हंगामाची पूर्वतयारी, नियोजन व पिकांची निवड” या विषयावर आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी या संवाद मालिकेचे शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, सध्या जमिनीत मुबलक ओलावा उपलब्ध आहे. या नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून येणाऱ्या रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, करडई, जवस आदी पिकांची नियोजनबद्ध लागवड करावी. यामुळे खरीपातील नुकसानीची भरपाई होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. रब्बी हंगामात शास्त्रीय पद्धतीने पिकांचे नियोजन करून उत्पादनवाढ साध्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी हवामान स्थितीचा सविस्तर आढावा घेत, त्यानुसार पीक नियोजन, सिंचन व्यवस्थापन आणि हवामान आधारित सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख (उद्यानविद्या तज्ञ) यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील पिक व पाणी परिस्थितीचा सखोल आढावा घेत, रब्बी हंगामातील प्रमुख पिके जसे गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई तसेच कांदा, लसण, बटाटा यांसारख्या भाजीपाला पिकांचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी जिरे, बडीशेप, ओवा, चिया यांसारख्या पर्यायी पिकांच्या लागवडीसाठी जमिनीची योग्य पूर्वतयारी, वाण निवड, पेरणी कालावधी व बाजारपेठेतील संधी याबाबतही उपयुक्त माहिती दिली.

प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ) यांनी शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी जमिनीतून प्रसारित होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स हे सेंद्रिय जैवउपचार एकरी ३ किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून वापरण्याचे आवाहन केले. तसेच मर रोगाचा प्रतिकारक्षम असलेल्या विद्यापीठाच्या संशोधित वाणांची निवड करण्याचे सुचवले.

डॉ. महेश अंबोरे (पशुवैद्यक तज्ञ) यांनी रब्बी हंगामातील पशुधनाचे आरोग्य, पोषण व देखभाल यावर मार्गदर्शन केले, तर सौ. अल्का पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांनी ग्रामीण कुटुंबांमधील संतुलित पोषण, महिलांचे आरोग्य आणि आहार नियोजन यावर उपयुक्त माहिती दिली.

कार्यक्रमात डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. डी. आर. कांबळे, डॉ. हनुमान गरुड तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबेजोगाई आणि तुळजापूर येथील कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ यांनीही आपले विचार मांडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ, कृ.वि.के. पोखर्णी) यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

या संवाद सत्रात एकूण ७३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. राकेश वाडीले (कृ.वि.के. पोखर्णी) यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. या शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद मालिकेच्या माध्यमातून विद्यापीठ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार करून त्यांना आत्मनिर्भर व वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करीत आहे.