शासकीय कृषि महाविद्यालयातील केवळ १२ जागा रिक्त तर अन्न तंत्रज्ञान आणि उद्यानविद्या अभ्यासक्रमांच्या सर्व जागा पूर्णपणे भरल्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी हे शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असून, गेल्या तीन शैक्षणिक वर्षांत विद्यापीठातील विद्यार्थी प्रवेशामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विद्यापीठाचे शासकीय व संलग्न महाविद्यालयांतील प्रवेश आकडेवारीनुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात एकूण ३४८२ विद्यार्थी प्रवेशित झाले. त्यानंतर २०२४-२५ मध्ये ही संख्या वाढून ३८७२ वर पोहोचली, तर सर्वात अलीकडील २०२५-२६ शैक्षणिक वर्षात ४०४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
कृषि आणि संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शासकीय महाविद्यालयांमध्ये
महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषद,
नवी दिल्ली यांचे कोटे वेगवेगळे असतात. त्यानुसार विद्यापीठाच्या शासकीय
कृषि महाविद्यालयातील महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या कोट्यातील केवळ
१२ जागा रिक्त असून अन्न तंत्रज्ञान आणि उद्यानविद्या या अभ्यासक्रमांच्या सर्व जागा
पूर्णपणे भरल्या आहेत. इतर संलग्न शाखांतील ८४ जागा रिक्त असून या जागा भारतीय कृषि
अनुसंधान परिषदेच्या कोट्यातून भरल्या जावू शकतात. तसेच खाजगी कृषि आणि संलग्न अभ्यासक्रमांच्या
महाविद्यालयांमध्ये एकूण ११५७ जागा रिक्त आहेत.
विशेष म्हणजे कृषि अभियांत्रिकी शाखेतील गेल्या वर्षी केवळ ५० जागा भरल्या,
त्या या वर्षी ६८ भरल्या असून, अन्न तंत्रज्ञान या शाखेमधील यापूर्वी रिक्त राहत असलेल्या
जागादेखील यावर्षी पूर्णतः भरल्या आहेत. ही आकडेवारी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण
शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यावर विद्यार्थ्यांचा वाढता
विश्वास दर्शविते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषिक्षेत्रात उल्लेखनीय यश
संपादन करत राष्ट्रीय पातळीवर आपली भक्कम छाप उमटवली आहे. गेल्या दोन वर्षांत
संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्यामध्ये साधलेल्या प्रगतीमुळे विद्यापीठाने अनेक
मानांकने आणि क्रमवारी पटकावले आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR)
राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीने विद्यापीठास प्रतिष्ठेचे
‘ए ग्रेड’ मानांकन प्रदान केले असून, विद्यापीठाने ३.२१/४
गुणांसह उच्चांकी स्थान मिळवले आहे. तसेच, भारतीय शैक्षणिक
संस्था मूल्यांकन प्रणाली (IIRF) २०२५ मध्ये विद्यापीठाने राष्ट्रीय
स्तरावर ३३वा क्रमांक मिळवत एक मानाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय, कृषि विषयक अग्रगण्य संकेतस्थळ ‘अॅग्रीटेल डॉट कॉम’
ने जाहीर केलेल्या देशातील उच्च शिक्षणासाठी सर्वोत्तम दहा कृषि विद्यापीठांमध्ये वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा समावेश केला आहे.
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, जैवतंत्रज्ञान आणि उद्यमशीलतेवर विद्यापीठाचा विशेष भर असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल सतत वाढत आहे. हे आमच्यासाठी अभिमानास्पद यश आहे. या वाढत्या प्रवेशसंख्येमुळे मराठवाड्यातील कृषि शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.