Wednesday, October 15, 2025

अतिवृष्टीग्रस्त धाराशीव जिल्ह्यातील कळंब तालुक्याला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट – शेतकऱ्यांना दिला धीर, रब्बी हंगामासाठी शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन

 

धाराशीव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी या पूरग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

या वेळी माननीय कुलगुरू यांनी सांगितले की, कृषि विद्यापीठ आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. याबरोबरच त्यांच्यासोबत आलेल्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या चमूने रब्बी हंगामासाठी तसेच खरडून गेलेल्या जमिनींच्या पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा (Draft) तातडीने तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणी दौर्‍यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. अस्सलकर, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन सूर्यवंशी, विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे, तसेच तालुका कृषि अधिकारी श्री. सरडे उपस्थित होते. खोंदला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भेटीत सहभागी झाले.

यावेळी ग्रामस्थांनी प्रशासन आणि विद्यापीठाकडून अपेक्षा व्यक्त करत विविध मागण्या मांडून करत आपल्या व्यथा नमूद केल्या.

पाहणी केल्यानंतर माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना पुढील उपाययोजना सुचवल्या —

तूर पिकासाठी:

सततच्या पावसामुळे वांझ व मर रोग वाढण्याची शक्यता; त्यासाठी डायमिथोएट (रोगर) 20 मिली + मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब (रिडोमिल गोल्ड) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी घ्यावी. तसेच ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स चार लिटर 250 लिटर पाण्यात मिसळून अळवणी द्यावी.

हरभरा पिकासाठी:

पेरणीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी. बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. शेवटच्या कोळपणीपूर्वी चार किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स एक एकर क्षेत्रासाठी वापरावे.

मोसंबी व फळपिकांसाठी:

अतिवृष्टीमुळे फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम किंवा रिडोमिल गोल्ड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. तसेच ट्रायकोडर्मा/बायोमिक्स चार किलो प्रति 250 लिटर पाण्यात मिसळून आळवणी द्यावी.

सर्व पिकांसाठी:

पिवळेपणा कमी करण्यासाठी 19:19:19 खत 100 ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्य (ग्रेड-2) 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी तसेच 25% खताची अतिरिक्त मात्रा जमिनीतून द्यावी.

माती खरडून गेलेल्या जमिनींसाठी:

सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत किंवा ग्रीन मॅन्युरिंग करावे. कठीण जमिनीवर उन्हाळ्यात तलावातील गाळ टाकून 15–20 सें.मी. सुपीक थर निर्माण करावा.

या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या समस्या आणि शास्त्रज्ञांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे, पूरग्रस्त भागातील शेती पुनरुज्जीवनासाठी माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ व कृषि विभाग मिळून समन्वयाने कार्य करणार असल्याची माहिती विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी दिली.