माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठास संशोधन क्षेत्रात गौरवास्पद यश
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील
राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित केलेल्या बाजरीच्या (जैवसंपृक्त )
दोन संकरीत वाणांना भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क नोंदणी
प्राधिकरणाकडून (Protection
of Plant Varieties and Farmers’ Rights Authority - PPV&FRA)
अधिकृत नोंदणी मिळाली आहे.
विद्यापीठाने विकसित केलेल्या AHB 1200Fe (MH 2072) व AHB
1269Fe (MH 2185) या बाजरी (Pennisetum glaucum (L.) R.Br.) वाणांना विद्यमान (अधिसूचित)
वनस्पती वाण (Extant -Notified Plant Variety) म्हणून नोंदणी प्रदान करण्यात आली आहे. ही नोंदणी ४ डिसेंबर २०२५ रोजी
देण्यात आली असून नोंदणी क्रमांक अनुक्रमे REG/2025/0236 व
REG/2025/0237 असे आहेत.
या जातींसाठी विद्यापीठ हे खरे पैदासकार आणि संवर्धक (True Breeder) असल्याचे
मान्य करण्यात आले असून, वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क
संरक्षण अधिनियम, २००१ अंतर्गत विद्यापीठास या वाणांच्या
उत्पादन, विक्री, वितरण, आयात व निर्यातीचे विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. प्रारंभी सहा
वर्षांसाठी ही नोंदणी वैध असून त्यानंतर नूतनीकरणाची तरतूद आहे.
ही नोंदणी विद्यापीठासाठी अत्यंत गौरवास्पद असून संशोधन क्षेत्रातील एक
महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे. हे यश माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सततच्या मार्गदर्शन व प्रेरणेमुळे शक्य झाले. तसेच संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग यांचे मोलाचे सहकार्य व शास्त्रीय मार्गदर्शन लाभले. याशिवाय
या प्रक्रियेत नोडल अधिकारी डॉ. व्ही. एन. चिंचणे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका
बजावली.
ही नोंदणी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सातत्यपूर्ण संशोधन कार्याची
पावती असून विकसित झालेल्या या संकरित जाती शाश्वत शेतीस चालना देणाऱ्या ठरणार
आहेत. त्यामुळे मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त व अधिक उत्पादनक्षम
बाजरीच्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून त्यातून उत्पादन व उत्पन्न वाढीस
मोठा लाभ होणार आहे. या वाणांमुळे उत्पादनक्षमता वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक
सक्षमीकरण होण्यास मदत होईल. त्यामुळे ही नोंदणी शेतकरी, संशोधक व
विद्यापीठ यांच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
या वाणांच्या विकासामध्ये विद्यापीठाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. पवार,
हैदराबाद येथील आयआयएमआरचे संचालक डॉ. सी. तारा सत्यवती, विद्यापीठाचे माजी बाजरी पैदासकार
डॉ. एन. वाय. सातपुते, हार्वेस्ट प्लस
कार्यक्रमाचे बाजरी पैदासकार डॉ. एम. गोविंद राज, विद्यापीठाचे बाजरी पैदासकार डॉ.
ए. बी. बागडे, बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डी. के. पाटील, माजी कृषि विस्तार
शास्त्रज्ञ डॉ. आर. सी. सावंत आदी शास्त्रज्ञांनी प्रमुख संशोधन कार्य केले आहे.
वाणांची वैशिष्ठ्ये
बाजरीचा संकरीत वाण ‘एएचबी-१२०० Fe’
हा वाण २०१७
साली प्रसारित करण्यात आला असून खरीप हंगामासाठी विशेष शिफारस करण्यात आली आहे. या
वाणाचा पिकाचा कालावधी केवळ ८० ते ८५ दिवस इतका असून अल्प कालावधीत भरघोस उत्पादन
देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. हेक्टरी धान्य उत्पादन २५ ते ३० क्विंटल तर कडबा
उत्पादन ५५ ते ६० क्विंटल इतके मिळते. या वाणाची कणसे घट, दाणे टपोरे असून त्यांचा रंग हिरवट आहे. तसेच
फुटव्याचे प्रमाण जास्त असल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होते. १००० दाण्यांचे वजन
१५ ते १८ ग्रॅम इतके असून धान्य दर्जेदार मिळते. या वाणामध्ये लोहाचे सरासरी
प्रमाण ८८ मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. तर जस्ताचे प्रमाण ४३ मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. इतके असून
पोषणमूल्याच्या दृष्टीने हा वाण अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या वाणाची संपूर्ण
देशात प्रसारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे
हा वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक असल्यामुळे रोगांपासून होणारे नुकसान कमी
होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्याची संधी उपलब्ध होत
आहे.
हा वाण सन
२०१८ मध्ये प्रसारित करण्यात आला असून खरीप हंगामासाठी विशेषतः शिफारस करण्यात आली
आहे. हा वाण ८० ते ८२ दिवसांत तयार होतो. याची धान्य उत्पादकता प्रतिहेक्टरी ३० ते
३२ क्विंटल तर कडबा उत्पादन ७२ ते ७५ क्विंटल इतके मिळते. या वाणाचे कणीस घट्ट व
टपोरे असून दाण्यांचा रंग हिरवट आहे. फुटव्याचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादनात
वाढ होते. १००० दाण्यांचे वजन १५ ते १८ ग्रॅम इतके आहे. या वाणामध्ये पोषणमूल्येही
अधिक असून लोहाचे प्रमाण सरासरी ९१ मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. व जस्ताचे प्रमाण ४५
मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. इतके आहे. त्यामुळे हा वाण पोषणदृष्ट्या समृद्ध मानला जात आहे.
या गुणवत्तेमुळे संपूर्ण देशात प्रसार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच हा
वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक असल्यामुळे उत्पादनात स्थिरता मिळते व
शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो. त्यामुळे मराठवाड्यासह इतर कोरडवाहू भागातील
शेतकऱ्यांसाठी हा बाजरी वाण फायदेशीर ठरणार आहे.



