Thursday, February 26, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत पेडगाव (ता. परभणी) येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) अंतर्गत मौजे पेडगाव (ता. परभणी) येथे दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण शिबिर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या प्रशिक्षण शिबिरात पेडगाव परिसरातील संत्रा, कागदी लिंबू, केळी व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. उत्पादन खर्च कमी करून पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने बीज प्रक्रिया, जैविक व सेंद्रिय खते, विद्राव्य खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा एकात्मिक खत व्यवस्थापनात कसा उपयोग करावा, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

उपसंशोधन संचालक तथा मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी प्रत्यक्ष बागेत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य व पीक पोषणासंदर्भातील समस्यांचे निराकरण करून दाखविले. तसेच रासायनिक खतांचा संतुलित व मर्यादित वापर, माती परीक्षणाचे महत्त्व आणि जैविक खतांच्या वापरातून जमिनीचे आरोग्य सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

मृद विज्ञान विभागातील दीर्घकालीन खतप्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजना, प्रशिक्षण शिबिराची भूमिका स्पष्ट केली तसेच रासायनिक खत वापराचा जमिनीवर होणारा परिणाम व पिकांच्या उत्पादकतेशी असलेले नाते यावर मार्गदर्शन केले.

या शिबिरात शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक माहितीच देण्यात आली नाही, तर प्रतिनिधीक स्वरूपात विद्यापीठाद्वारे उत्पादित एनपीके कन्सोर्शियम जैविक खत, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त व विद्राव्य खतांचे वितरणही करण्यात आले. माती परीक्षण, खतांचा योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने वापर कसा करावा, याचे सविस्तर प्रात्यक्षिकही घेण्यात आले.

विद्यापीठातील विविध सेवा व उपलब्ध निविष्ठांची माहिती देत शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठाशी सातत्याने संपर्कात राहावे, असे आवाहन डॉ. कौसडीकर यांनी केले. हे प्रशिक्षण शिबिर श्री. विजय गंगाधर जंगले यांच्या शेतावर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात पारधी बाळासाहेब आनंदराव, राजेश्वर सिताराम शिंदे, कुलदीप जगदीशराव देशमुख, राजेश दिलीपराव देशमुख, अर्जुन मुंजाभाऊ शिंदे, आप्पाराव गायकवाड, चंद्रकांत किशनराव देशमुख, संजय ठोंबरे, रमेश बापूराव पारधी, विजय गंगाधर जंगले, कृष्णा मुकुंदराव घुले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध फळझाडे व पिकांबाबतच्या पीक पोषण समस्यांचे समाधान करून घेतले.