वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत
महिला केंद्राच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भुवनेश्वर येथील केंद्रीय
कृषिरत महिला संस्थान पुरस्कृत अनुसूचित जाती उपयोजने (एससीएसपी) अंतर्गत अनुसूचित
प्रवर्गातील महिलांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी २०२६
दरम्यान आयोजन करण्यात आले. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक
डॉ खिजर बेग यांच्या मार्गदर्शनखाली प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले.
प्रशिक्षणाचे
उद्धाटन दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय कुलसचिव श्री. संतोष वेणीकर
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी
व्यासपीठावर विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके
(कृषि अभियांत्रिकी ), डॉ नीता गायकवाड (सामुदायिक विज्ञान), सहाय्यक कुलसचिव श्री.
राम खोबे, उमग – ग्रामविकासचे अध्यक्ष श्री.
जयाजी पाईकराव (अमर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली), श्रीमती सुशीलाताई पाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात
माननीय कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी नमूद केले की कुशल व डायनॅमिक महिला
म्हणजे काय,
याचे उत्तम उदाहरण या महाविद्यालयाच्या नवनियुक्त सहयोगी अधिष्ठाता डॉ.
नीता गायकवाड आहेत. महाराष्ट्रात एकमेव असलेल्या या महाविद्यालयाचे बळकटीकरण व
सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी असून, या कार्यासाठी विद्यापीठ प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील,
असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रशिक्षण कार्यक्रमास महिलांचा
लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद असून, हे
महाविद्यालयाच्या यशाचे द्योतक आहे. सध्या महिलांचे सबलीकरण झालेले असून त्या शेती,
उद्योग-व्यवसाय, रोजगार, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत आहेत. तथापि, सर्वसाधारणपणे प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये पुरुषांनाच प्राधान्य दिले जात
असे. मात्र, या महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वित संशोधन
प्रकल्प (कृषिरत महिला) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे महिलांच्या
क्षमतांचा निश्चितच विकास होईल, असा विश्वास माननीय कुलसचिव
यांनी व्यक्त केला. तसेच महिलांवरील ताण कमी होण्यासाठी व आरोग्यवर्धनासाठी
त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान आहार-विहाराविषयी
सविस्तर माहिती देऊन महिलांचे शारीरिक व मानसिक संतुलन वाढवावे, तसेच स्वतःच्या आरोग्यासाठी आध्यात्मिक कृतींचा अंगीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यापीठ
अभियंता श्री. दीपक कशाळकर यांनी हे प्रशिक्षण अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रशिक्षणाच्या
दरम्यान विद्यापीठामध्ये डॉ. राहुल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात
येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाची पाहणी करावी व सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणे व
अवजारांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. राहुल
रामटेके यांनी क्षमता बांधणीनंतर महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल व त्यांच्यात
नाविन्यपूर्ण कौशल्यांचा विकास होईल,
असे सांगितले. तसेच या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग
उत्पादन ते विक्री व्यवस्थापनापर्यंत करून उद्योग-व्यवसाय उभारावा व स्वतःचे तसेच
कुटुंबाचे सबलीकरण साधावे, असे आवाहन त्यांनी केले. याबरोबरच
विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना भेट देण्याचीही त्यांनी विनंती
केली.
सहाय्यक
कुलसचिव श्री. राम खोबे यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला स्वावलंबन व सबलीकरणासाठी
क्षमता बांधणीचे महत्त्व विशद केले.
श्री.जयाजी
पाईकराव यांनी महिलांच्या सबलीकरणाचे विविध टप्पे विशद केले. सुरुवातीला जिच्या
हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उधारी असे
म्हटले जायचे. त्यानंतर जिच्या हाती पैशाची दोरी, ती जगाला
उधारी असे संबोधले जाऊ लागले. आता मात्र जिच्या हाती उद्योगाची दोरी, ती जगाला उधारी असे संबोधले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या
उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महिलांचे मोठ्या प्रमाणात सबलीकरण होत आहे. पूर्वी
सुमारे ३० टक्के असलेली कर्ज परतफेडीची क्षमता आता ९८ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे
त्यांनी सांगितले. महिलांची क्षमता वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून
व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या निधीतून राबविण्यात येत असलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम
प्रभावी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘उमेद’च्या
माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत, या प्रशिक्षणातील महिलांचा सहभाग हा त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी नमूद
केले. हिंगोली जिल्ह्यातील दोन गावांमधून ४० हून अधिक महिलांनी या प्रशिक्षणात
सहभाग घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
प्रास्ताविकात
डॉ. नीता गायकवाड यांनी महिलांनी आपली सर्व कामे बाजूला ठेवून प्रशिक्षणात सहभाग
घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पामार्फत
राबविण्यात येणाऱ्या योजनांची व महाराष्ट्रातील १४५ गावांमध्ये करण्यात आलेल्या
विस्तार कार्याची माहिती दिली. याशिवाय या क्षमता बांधणी प्रशिक्षणामध्ये आयोजित
करण्यात आलेल्या व्याख्यानांची व प्रात्यक्षिकांचीही माहिती त्यांनी सविस्तर दिली.
उद्घाटन समारंभात
संगीताविषयी उगम गीत सादर करण्यात आले, तर कल्पना सुगंधी यांनी आपले
मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. नीता गायकवाड यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. एकनाथ लंगोटे यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये
हिंगोली जिल्ह्यातील ४० हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता
गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पातील यंग प्रोफेशनल प्रसाद देशमुख, आशा
पवार, सादिया यास्मिन, चंद्रप्रकाश
लहाडे, अमीर शेख तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम
घेतले.
या प्रशिक्षण
कार्यक्रमामार्फत अनुसूचित प्रवर्गातील महिलांच्या कौशल्यविकासाला चालना देऊन
त्यांची आत्मनिर्भरता वाढविणे तसेच कृषिपूरक उपजीविकेच्या संधी विस्तारित करण्यावर
विशेष भर देण्यात येणार आहे.
.jpeg)


.jpeg)
.jpeg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)

