Monday, February 23, 2026

कृषि शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश : एआय फार ॲग्री (AI4Agri) परिषदेत तज्ज्ञांची सखोल चर्चा

कृषि शिक्षणात एआय समावेशासाठी तातडीच्या कृतीची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन


दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी कृषि शिक्षण, संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) प्रभावीपणे समाविष्ट करण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. एआय फार ॲग्री (AI4Agri) २०२६ जागतिक परिषद आणि गुंतवणूक शिखर परिषदे अंतर्गत आयोजित कृषि शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचे मुख्य प्रवाहिकीकरण : कौशल्ये, नवोन्मेष, इनक्युबेशन आणि संस्थात्मक रूपांतरण” (Mainstreaming Artificial Intelligence in Agricultural Education: Skills, Innovation, Incubation and Institutional Transformation) या विषयावरील गोलमेज चर्चासत्रात हे विचार मांडण्यात आले.

या चर्चासत्राचे आयोजन महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, हे सत्र इंडिया एआय  इम्पॅक्ट समीट २०२६ (India AI Impact Summit 2026) शी संलग्न उपक्रम म्हणून पार पडले. कार्यक्रमाचे संयोजन एआय फार ॲग्री संशोधन नेटवर्क (AI4Agri Research Network -AI4ARN) अंतर्गत करण्यात आले.

मुख्य भाषणात हैद्राबाद येथील हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्धकोरडवाहू उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (इक्रीसॅट - ICRISAT – International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics) माननीय महासंचालक डॉ. हिमांशु पाठक यांनी कृषि शिक्षणात एआय, डेटा सायन्स व डिजिटल तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित होतील, असे प्रतिपादन केले.

या चर्चासत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रीस्तोलचे माननीय कुलगुरू प्रा. इव्हलिन वेल्च, व्हीजेटीआयचे  प्रा. फारूक काझी, तसेच आयसीएआर – नार्मचे डॉ. रामसुब्रमणियन यांनी अभ्यासक्रम सुधारणा, प्राध्यापक प्रशिक्षण व आंतरशाखीय अध्यापनाच्या गरजेवर सविस्तर मार्गदर्शन केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने जगभरात अभूतपूर्व वेगाने परिवर्तन घडवून आणले असून, उच्च कृषि शिक्षण संस्थांनी या बदलांना सामोरे जाण्यासाठी तातडीने व धोरणात्मक पावले उचलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 तसेच आयसीएआरच्या सहाव्या डीन समितीच्या शिफारसीनुसार पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ६ ते १० श्रेयांक (क्रेडिट्स) MOOCs/ऑनलाईन अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर “कृषि क्षेत्रातील एआयया विषयावर ६–१० क्रेडिट्सचे MOOCs अभ्यासक्रम विकसित करून शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. हे अभ्यासक्रम यूजीसी मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत ठेवून SWAYAM व्यासपीठावर उपलब्ध करून दिल्यास देशभरातील विद्यार्थ्यांना लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले. याबरोबरच उच्च दर्जाच्या शैक्षणिक सामग्री निर्मितीसाठी प्रत्येक कृषि विद्यापीठात प्रोफेशनल MOOC डेव्हलपमेंट लॅब स्थापन करण्याची गरज असून, त्यामध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओ, व्हिडिओ एडिटिंग सुविधा, एआय-आधारित कंटेंट क्रिएशन टूल्स, एलएमएस इंटिग्रेशन व प्रशिक्षित मनुष्यबळ असावे, असे मत व्यक्त करण्यात आले. अभ्यासक्रम रचना, तांत्रिक मार्गदर्शन व उद्योगस्नेही केस स्टडीसाठी आघाडीच्या एआय उद्योग भागीदारांशी सहकार्य केल्यास गुणवत्ता व व्यावहारिक उपयुक्तता वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि विद्यापीठांसाठी स्वतंत्र एआय एकत्रीकरण अर्थसंकल्प उपलब्ध करून देणे, विभागस्तरावर एआय सॉफ्टवेअर लायसन्स, संशोधन साधने, डेटा अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म व क्लाऊड संगणन संसाधनांसाठी निधी देणे अत्यावश्यक असल्याचे यांनी नमूद केले.

दुसरा विषय अनुभवाधारित शिक्षण, सामायिक डिजिटल पायाभूत सुविधा व संयुक्त अध्यापन याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख, थायलंड येथील आशियन तंत्रज्ञान संस्था, नेदरलँड्स येथील वागेनीनगन युनिव्हर्सिटी आणि संशोधन संस्था   (Wageningen University & Research), तसेच आय आय टी खरगपूर येथील तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

तिसऱ्या विषयात कृषि विद्यापीठांमध्ये इनक्युबेशन केंद्रांची स्थापना, स्टार्टअप संस्कृतीचा विकास व उद्योग–विद्यापीठ सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे माननीय कुलगुरू डॉ. विलास खर्चे, तसेच पुणे येथील कृषि परिषदेच्या माननीय महासंचालक श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल (आयएएस) यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.

या चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. सुनील डी. गोरंटीवार यांनी केले. प्रारंभी त्यांनी कृषि क्षेत्रात एआयच्या वाढत्या उपयोगावर तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या गरजेवर प्रकाश टाकला.

चर्चेच्या शेवटी कृषि शिक्षणात एआय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अभ्यासक्रम सुधारणा, कौशल्य विकास कार्यक्रम, डिजिटल पायाभूत सुविधा व स्टार्टअप–आधारित उपक्रम राबविण्याबाबत शिफारसी मांडण्यात आल्या. या उपक्रमामुळे भविष्यात कृषि क्षेत्रात एआय–आधारित रोजगार व नवोन्मेषाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

एआय फार ॲग्री (AI4Agri) २०२६ जागतिक परिषद आणि गुंतवणूक शिखर परिषदेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. गजेंद्र जगताप तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व विद्यार्थी उपस्थित होते.