वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (सीएईटी), परभणी येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची व्हीएसटी टीलर्स ट्रॅक्टर्स लि. (VST Tillers Tractors Ltd), बेंगळुरू येथे निवड झाली आहे. ही निवड दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित कॅम्पस मुलाखतीदरम्यान करण्यात आली.
सदर कॅम्पस मुलाखत विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या उपस्थितीत कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख इंजि. तेजस्वी, इंजि. शशिकांत पाटील आणि प्राजना मॅडम यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
या कॅम्पस मुलाखतीत दर्शन जाधव, श्रेयस वाजे आणि अखिलेश मांदले या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना वार्षिक ४.२ लाख रुपयांचे आकर्षक वेतन पॅकेज मिळणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दत्तात्रय पाटील, ट्रेनिंग को-ऑर्डिनेटर डॉ. मधुकर मोरे तसेच प्रा. अनिकेत वाईकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशाबद्दल विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी, महाविद्यालयातील विभागप्रमुख व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच चालू सत्रात विविध सिंचन कंपन्या व पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या कॅम्पस मुलाखतींचेही आयोजन करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.




