माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे अध्यक्षीय भाषण : कृषिरत महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रमांचे कौतुक, प्रशिक्षण व मूल्यांकनावर भर
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत
महिला केंद्राच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भुवनेश्वर येथील केंद्रीय
कृषिरत महिला संस्थान पुरस्कृत अनुसूचित जाती उपयोजने (एससीएसपी) अंतर्गत अनुसूचित
प्रवर्गातील महिलांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी
२०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षणाचा
समारोप दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता तथा केंद्र समन्वयिका डॉ नीता गायकवाड, उमग –
ग्रामविकासचे अध्यक्ष श्री. जयाजी पाईकराव (अमर, ता. कळमनुरी,
जि. हिंगोली), श्रीमती सुशीलाताई पाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय
भाषणात माननीय माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भारतीय कृषि अनुसंधान
परिषद अंतर्गत भुवनेश्वर येथील केंद्रीय कृषिरत महिला संस्थान यांच्या शेतकरी
महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. महिलांची शेतीतील
भूमिका व सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून त्यांची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी तसेच
उद्योग उभारणीसाठी अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत महिलांना साहित्य उपलब्ध करून
देण्यात आल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
सदर साधने व
अवजारे महिलांच्या शारीरिक रचनेनुसार तयार करण्यात आली असून त्यांचा वापर करताना
महिलांना थकवा न येता सुलभ व आरामदायीरीत्या काम करता येईल, असे त्यांनी नमूद केले. शासनाने अनुसूचित
जातीतील महिलांची क्षमता वाढवण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला असल्याचे
त्यांनी सांगितले.
या
योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रत्यक्षात कितपत लाभ होत आहे याचे
मूल्यांकन करणे आवश्यक असून त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत किती
सुधारणा झाली आहे, हेही तपासावे,
असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे भविष्यात अशा योजना अधिक प्रभावीपणे
राबविण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच महिलांना
साधने व अवजारे देतानाच त्यांचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देणे आणि त्या साधनांच्या
उपलब्धतेबाबत सविस्तर माहिती देणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या ‘शेतकरी देवो भव’ या भावनेतून सुरू असलेले कार्य या उपक्रमांद्वारे
प्रत्यक्षात साकार होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे
प्रस्ताविक डॉ. नीता गायकवाड यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी नमूद केले की
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सहा गावांमधून एकूण १८० महिलांनी या प्रशिक्षण
कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. या महिलांना आजोला (अॅझोला) उत्पादन तसेच
गांडूळ खत निर्मिती या आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले
असून, त्याद्वारे त्यांच्या
कौशल्यविकासासोबतच आर्थिक स्वावलंबनाची क्षमता विकसित करण्यात आली आहे.
या
प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर उद्योगशील
दृष्टीकोन निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यांना सक्षम उद्योजिका
घडविण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन,
प्रेरणा व आवश्यक पाठबळ देण्यात आले. तसेच योजनेच्या वतीने संबंधित
उद्योग उभारणीसाठी लागणारी आवश्यक साधनसामग्रीही उपलब्ध करून देण्यात आली.
या सर्व
उपक्रमांमुळे प्रशिक्षणार्थी महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करून स्थिर उत्पन्नाचे
साधन निर्माण करता येईल आणि त्या निश्चितच ‘लखपती दीदी’ म्हणून पुढे येतील, असा विश्वास डॉ. नीता गायकवाड यांनी व्यक्त
केला.
सूत्रसंचालन डॉ.
किशोर कौसडीकर यांनी केले, तर आभार डॉ. नीता गायकवाड
यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या कळमनुरी
तालुका व्यवस्थापक श्रीमती स्मिता कटके यांचीही प्रमुख उपस्थिती होती
तीन दिवस कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी डॉ. नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पातील यंग प्रोफेशनल
प्रसाद देशमुख,
आशा पवार, सादिया यास्मिन, चंद्रप्रकाश लहाडे, अमीर शेख तसेच महाविद्यालयातील
कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
