‘हिंद की चादर’श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात जनजागृती रॅली
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयांतर्गत परभणी
येथील कृषि,
उद्यानविद्या, अन्नतंत्रज्ञान, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर
साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी
कृषी महाविद्यालय परिसरात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली.
हा कार्यक्रम
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार
पडला. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ.
राकेश अहिरे, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल
रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, डॉ.
विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
रॅलीमध्ये विद्यापीठ
मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांतील व कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी,
विद्यार्थी तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या पूर्व-प्रायोगिक प्राथमिक
शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग
बहादूर साहिबजी यांच्या महान कार्याचे स्मरण करणाऱ्या घोषणांनी संपूर्ण परिसर
दुमदुमून गेला. उपस्थितांनी त्यांच्या शहादतीला भावपूर्ण अभिवादन केले.
अध्यक्षीय भाषणात
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी
व धार्मिक स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करून संपूर्ण जगाला सहिष्णुता,
सत्य आणि त्यागाचा मार्ग दाखविला आहे. पुढे ते म्हणाले की, आजच्या
सामाजिक परिस्थितीत जाती–धर्मांमध्ये कोणताही तेढ निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येकाने परस्परांच्या श्रद्धेचा तसेच व्यक्तिस्वातंत्र्याचा
सन्मान करणे अत्यावश्यक आहे. सहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाल्यासच देशाची खरी
प्रगती साध्य होऊ शकते. पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, देशाने
तसेच महाराष्ट्राने घडवून आणलेल्या थोर महापुरुषांचा इतिहास, त्यांचे कार्य, त्याग व बलिदान यांची माहिती
प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपण सुखाने व शांततेत जीवन
जगत आहोत, त्यामागे साडेतीनशे - चारशे वर्षांपूर्वीचा
संघर्षमय इतिहास दडलेला आहे. हा इतिहास आजच्या पिढीने समजून घेणे आवश्यक असून
भारताची अब्रू वाचवण्यासाठी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी
अतुलनीय बलिदान दिले, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन
करताना शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर
साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवता व सत्यासाठी दिलेल्या सर्वोच्च
बलिदानाचा गौरव केला. त्यांनी जोपासलेली मूल्येच आज त्यांच्या ३५० व्या शहीदी
समागम वर्षानिमित्त स्मरणात आणली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात विद्यार्थी
कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी
यांच्या त्यागमय जीवनकार्याची माहिती देत अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या
विचारांतून युवकांना योग्य दिशा मिळते, असे नमूद केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर, डॉ. फरिया खान, डॉ. प्रवीण घाडगे, डॉ. सुभाष विखे तसेच डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी विशेष परिश्रम घेतले.

.jpeg)
.jpeg)



.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
