Friday, January 9, 2026

वनामकृविद्वारा शाळा–महाविद्यालय समन्वयासाठी ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रमावर कार्यशाळेचे आयोजन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे जिरेवाडी (ता. परळी) येथील कृषी महाविद्यालयीन, आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत स्कूल कनेक्ट कार्यक्रम (School Connect Programme) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मांडली असून, त्यास शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिनेशसिंह चौहान, होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ. रणजीत चव्हाण हे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. दिनेशसिंह चौहान यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, संशोधनाभिमुख व भविष्याभिमुख शिक्षण देण्याची गरज अधोरेखित केली. कृषी व्यवस्थापन व कृषी शिक्षणाच्या संदर्भात कनिष्ठ महाविद्यालयाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच कृषी शिक्षणाचे महत्त्व सांगून विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन शिक्षणातील व्यापक संधी त्यांनी उलगडून सांगितल्या.

प्रमुख पाहुणे डॉ. रणजीत चव्हाण यांनी स्कूल कनेक्ट कार्यक्रमाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती देताना विद्यार्थ्यांच्या करिअर घडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर विद्यार्थी-गुरू संवाद, शैक्षणिक संकुल भेट इत्यादींवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे (Skill Enhancement Courses) महत्त्व आणि संशोधन कार्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांचे (NET, SRF) महत्त्व स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाकडे वळण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिरेवाडी येथील कृषी महाविद्यालयाचे शिक्षण प्रभारी डॉ. विनोद शिंदे यांनी करताना कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत शाळा व महाविद्यालय यांमधील शैक्षणिक समन्वयाचे महत्त्व विशद केले.

या कार्यशाळेत उपस्थित प्राचार्यांना कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन शिक्षणातील भविष्यातील संधी, रोजगार, उद्योजकता, संशोधन व तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास परळी तालुक्यातील विविध विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच शिक्षण प्रभारी अधिकारी अशा एकूण २० ते २५ प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. बाबासाहेब मस्के यांनी प्रयत्न केले. तसेच श्री. अनंत मुंडे, श्री. कृष्णा पांचाळ व महाविद्यालयातील सर्व कर्मचारीवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. एस. टी. राठोड यांनी आभार मानले.  ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी व मार्गदर्शक ठरली, अशी भावना उपस्थित प्राचार्यांनी व्यक्त केली.