वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग आणि कृषी
तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषी विकास
योजनेच्या प्रकल्पांतर्गत मौजे शिरकळस,
तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथे पिकांमधील
अन्नद्रव्य कमतरता तसेच कीड-रोग निदानासाठी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन दिनांक ८ जानेवारी
२०२६ रोजी करण्यात आले.
या
भेटीदरम्यान मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. हरिहर
कौसडीकर, दीर्घकालीन खत प्रयोग
योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. रामप्रसाद खंदारे व सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ.
दिगंबर पटाईत यांच्या तज्ज्ञ पथकाने शेतकरी श्री. संजय भोसले यांच्या संत्रा बागेस
भेट दिली. पाहणीदरम्यान संत्रा पिकामध्ये झिंक व फेरस यांसारख्या सूक्ष्म
अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आढळून आली. त्यामुळे पानांचे पिवळेपण,
शिरा पिवळ्या पडणे व झाडांची वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसून आली असून
उत्पादनात घट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
अन्नद्रव्य
व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा
अवलंब करण्याचा सल्ला दिला. यामध्ये ग्रेड-२ मायक्रो न्यूट्रिएंट ५० मिली प्रति १०
लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करून अशा प्रकारच्या दोन फवारण्या करण्याची शिफारस
विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर व डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केली.
कीड
व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहणी केली असता संत्रा झाडांवर लाल कोळी तसेच मावा
यांसारख्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला. या किडींमुळे
झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे कीटकशास्त्रज्ञ
डॉ. दिगंबर पटाईत यांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून लाल कोळी व इतर रस शोषण
करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल,
डायफेंथ्युरॉन व प्रोपरगाइट यांसारख्या कोळी-नाशकांच्या दोन
फवारण्या घेण्याचा सल्ला देण्यात आला.
तज्ज्ञ पथकाने
यावेळी हळद पिकाच्या प्रक्षेत्रालाही भेट दिली. सध्या पडलेल्या थंडीमुळे पिकास
जमिनीतून अन्नद्रव्ये घेण्यास अडथळा निर्माण झाल्याने हळद पिकामध्ये पानांच्या कडा
पिवळ्या पडणे व करपणे अशी लक्षणे दिसून आली. यासाठी सध्याच्या परिस्थितीत
फवारणीद्वारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याचे मार्गदर्शन तज्ज्ञांनी
केले.
या प्रक्षेत्र
भेटीच्या वेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. त्यांनी अन्नद्रव्य कमतरता व
कीड-प्रादुर्भावामुळे पिकांना होणारे नुकसान तसेच त्यावरील योग्य व्यवस्थापनाबाबत
सविस्तर माहिती घेतली.
.jpeg)


