उच्च तेलांश व कमी खर्चाचे करडई वाण शेतकऱ्यांसाठी लाभदायक — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल
भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (AICRP on Safflower) मार्फत
विकसित करण्यात आलेल्या करडईच्या दोन सुधारित जातींना केंद्र शासनाकडून अधिकृत
अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण
मंत्रालयाच्या अधिसूचना क्र. S.O. 6123(E), दिनांक ३१ डिसेंबर
२०२५ अन्वये पीबीएनएस २२१ (परभणी सुजलाम) आणि पीबीएनएस २२२ (परभणी सुफलाम) या दोन करडई वाणांना अधिसूचित वाण म्हणून घोषित करण्यात आले
आहे.
हे दोन्ही वाण
झोन – १ साठी (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा) शिफारसीत करण्यात आले असून कोरडवाहू तसेच सिंचित परिस्थितीत
लागवडीस योग्य आहेत.
यानिमित्त बोलता माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांनी सांगितले की,
या नव्या वाणांच्या प्रसारणामुळे करडईच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास निश्चितच मदत
होणार असून शेतकऱ्यांना दर्जेदार, अधिक तेलांश असलेले उत्पादन मिळेल. परिणामी
उत्पादन खर्चात घट, उत्पन्नात वाढ आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक
स्थितीत सकारात्मक बदल घडून येईल, अशी त्यांनी आशा व्यक्त
केली. तसेच हे वाण कोरडवाहू व बदलत्या हवामानाच्या परिस्थितीतही उपयुक्त ठरतील,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की, या
दोन नवीन वाणांच्या प्रसारामुळे करडई पिकाचे उत्पादन व उत्पादनातील स्थैर्य
वाढण्यास मोठी मदत होणार असून, बदलत्या हवामान परिस्थितीतही
शेतकऱ्यांना हमखास व शाश्वत उत्पादन मिळू शकेल. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक
उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. तसेच करडई
पिकाच्या क्षेत्रवाढीस आणि राज्यातील तेलबियाणे उत्पादन वाढीसही या वाणांचा मोलाचा
वाटा राहणार आहे.
या
महत्त्वपूर्ण यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच संशोधन संचालक
डॉ खिजर बेग यांचे मोलाचे मार्गदर्शन,
प्रोत्साहन व सततच्या सहकार्याबद्दल अखिल भारतीय करडई संशोधन प्रकल्पाचे
प्रभारी अधिकारी डॉ. आर. आर. धुतमल यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक
आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
वाणांची वैशिष्ट्ये
करडईचे हे दोन सुधारित वाण सन २०२५ मध्ये विकसित केले असून कोरडवाहू तसेच बागायती शेतीसाठी योग्य असून शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पादन व उत्पन्नवाढीच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहेत.रब्बी हंगामात लागवडीस योग्य असलेल्या या वाणांची परिपक्वता कालावधी १२५ ते १३० दिवस इतका आहे.
पीबीएनएस–२२१ (परभणी सुजलाम) - या वाणाची बागायती परिस्थितीत उत्पादन क्षमता १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर असून कोरडवाहू परिस्थितीत १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर आहे. या वाणामध्ये मर रोग, अल्टरनेरिया रोग तसेच मावा किडीस सहनशीलता असून कोरडवाहू व बागायती दोन्ही परिस्थितीस उत्तम अनुकूलता आहे. या वाणामधील तेलाचे प्रमाण सुमारे ३४ टक्के आहे.
पीबीएनएस–२२२ (परभणी सुफलाम) - हा वाण मर (फ्युजेरियम विल्ट) रोगास मध्यम प्रतिकारक असून
त्याची उत्पादन क्षमता देखील बागायतीत १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर व कोरडवाहूत १२
ते १५ क्विंटल प्रति हेक्टर आहे. या वाणामध्ये तेलाचे प्रमाण सुमारे ३४.३८ टक्के असून
तोही कोरडवाहू व बागायती दोन्ही परिस्थितीस अनुकूल आहे.





