Thursday, January 1, 2026

वनामकृवित नववर्ष संवाद बैठक : भविष्यातील आव्हाने व दिशा यांवर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात नववर्षानिमित्त विद्यापीठातील शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यातील भविष्यातील आव्हाने आणि दिशा याविषयी दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

या वेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या संवाद बैठकीत प्रमुख मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू यांनी नमूद केले की, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वांना एकत्र शुभेच्छा देण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तसेच विद्यापीठातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निरोप देण्यासाठी दर महिन्याच्या शेवटी अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना शुभेच्छा द्याव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

विद्यापीठाने मागील वर्षात अनेक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असूनही सांघिक व वैयक्तिक क्षमतेने कार्य करून या यशामध्ये सर्वांनी योगदान दिले आहे. असेच प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून एकसंघ व समर्पण भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मागील वर्षी विद्यापीठात दीक्षांत समारंभ, कुलगुरू परिषद यांसारखे मोठे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. विद्यापीठाने आजपर्यंत कृषि शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले असून आतापर्यंत एकूण १,२९,२८४ विद्यार्थ्यांना कृषि शिक्षण प्रदान केले आहे आणि शेतकऱ्यांसाठी सक्षम व प्रभावी मनुष्यबळ घडवले आहे. शिक्षण बळकटीकरणासाठी नव्याने चार महाविद्यालयांची सुरुवात करण्यात आली असून विद्यापीठात ज्या बाबींमध्ये कमतरता आहे त्याची पूर्तता करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.

नुकतेच विद्यापीठातील विविध शाखांतील ४० विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवली आहे. त्यापैकी दहा विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या जेआरएफ परीक्षेची प्राथमिक पातळी उत्तीर्ण केली असून ते पुढील परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. येत्या काळात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया होणार असल्याने विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन तयारी करावी, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी ‘अविष्कार’ तसेच राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यश संपादन केले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा आणि यशस्वी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. हे विद्यापीठ कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या निकषांनुसार देशातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये असून भारतीय कृषि संशोधन परिषदेने विद्यापीठाला ‘अ’ दर्जाची अधिस्वीकृती दिली आहे. याबरोबरच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही विद्यापीठाला मिळाले आहेत. आपण ‘ए’ ग्रेड विद्यापीठाचे विद्यार्थी आहात याचा अभिमान बाळगा, पण अहंकार नको, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, स्वबुद्धी व धैर्याने कार्य करून अडचणींवर मात करावी. विद्यापीठ येत्या जानेवारी अखेरीस ‘अविष्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. विद्यापीठ प्रत्येक कार्य वेगळ्या व नावीन्यपूर्ण पद्धतीने करत असल्यामुळे वरिष्ठ पातळीवरून योजनांना व निधीला प्राधान्य मिळते, असेही त्यांनी नमूद केले. नुकतेच ‘कृषि समृद्धी’ योजनेअंतर्गत १३ नवीन प्रकल्प मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रत्येक कामासाठी योग्य तंत्र आवश्यक असून त्याचा समतोल वापर करावा, तसेच कार्यक्रमांची काटेकोर निगराणी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्तम नागरिक बनावे, अहंकार टाळावा, ज्ञानाचा गर्व करू नये आणि विनम्रतेने वाटचाल करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

शेवटी त्यांनी विद्यापीठाचे यश हे सामूहिक असल्याचे सांगून, पुढील पन्नास वर्षे स्मरणात राहील असे कार्य करावे, असे आवाहन केले व सर्वांना येणारे वर्ष सुख, समृद्धी, आनंद व आरोग्याचे जावो, अशा शुभेच्छा दिल्या.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी ‘स्वयम’ मध्ये यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मेंटोरचे कौतुक करून अभिनंदन केले. विद्यापीठाने राष्ट्रीय पात्रता परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असून, मात्र जेआरएफ व एसआरएफ मध्येही विद्यापीठाने अधिकाधिक यश संपादन करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. यासाठी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अध्यापन व मार्गदर्शनासाठी प्राधान्य द्यावे तसेच आपसात समन्वय ठेवावा, असे त्यांनी सुचविले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की विद्यापीठाच्या संशोधनामधून विकसित झालेल्या कापूस, तूर व सोयाबीन पिकांच्या जाती महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असून देशपातळीवरही चमकत आहेत. या निमित्ताने त्यांनी पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी दर्जेदार विषय व प्रकल्प निवडावेत आणि राष्ट्रीय स्तरावरील संशोधक बनावे, असे आवाहन केले.

या बैठकीत स्वयम पोर्टलच्या कार्याची प्रमुख जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळणारे डॉ. प्रविण कापसे तसेच इतर सर्व सहकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. स्वयम पोर्टलची माहिती सांगताना डॉ. प्रविण कापसे यांनी नमूद केले की, नवीन शैक्षणिक धोरण २०२० व सहाव्या अधिष्ठाता समितीच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा एक भाग म्हणून स्वयम पोर्टलद्वारे ऑनलाइन १० क्रेडिट्सची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील तिसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.

महाराष्ट्रातून टक्केवारीच्या तुलनेत परभणी कृषि विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परभणी कृषि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याबरोबरच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मेंटर्सपैकी परभणी कृषि विद्यापीठाच्या सात मेंटर्सना स्वयमकडून “बेस्ट परफॉर्मिंग मेंटर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले, तर आभार सह्याद्री अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नरेंद्र कांबळे व डॉ. धीरज पाथ्रीकर यांनी परिश्रम घेतले. या संवाद बैठकीस विद्यापीठातील सर्व विभागांचे प्रमुख प्राध्यापक तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.