वनामकृविच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयात गोळेगाव येथे रेशीम उद्योग उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि
महाविद्यालय, गोळेगाव (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी
दिल्ली यांच्या अनुसूचित जाती उप-योजना (SCSP) अंतर्गत तीन
दिवसीय रेशीम उद्योग उद्योजकता विकास व क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे.
दिनांक २३ जानेवारी
२०२६ रोजी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे तसेच महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर शेती
विकास उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जमीन दुरुस्ती, साफसफाई, सिंचन पाईपलाईन
टाकणे, बांध बंधिस्ती, चर खोदणे व
पाण्याच्या निचऱ्यासाठी पाईप बसविणे या विविध विकासात्मक कामांचे उद्घाटन माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.
मार्गदर्शन
करताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की,
रेशीम शेती हा अल्पभूधारक व युवकांसाठी उत्पन्नाचा शाश्वत आणि
खात्रीशीर स्रोत असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात
रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच उद्योजकतेचे
कौशल्य आत्मसात करावे, स्वतःवर विश्वास ठेवून नाविन्यपूर्ण
विचारसरणी विकसित करावी तसेच लहान-सहान अडचणींचा ताण न घेता सकारात्मक
दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे मौलिक
मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख
अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. ते म्हणाले की, रेशीम शेतीतील तांत्रिक कौशल्य आत्मसात
केल्यास युवक स्वतः उद्योजक बनू शकतातच, शिवाय रेशीम उत्पादक
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यातही मोलाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे
प्रशिक्षणार्थींनी मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतपातळीवर उपयोग करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी सहयोगी
अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, केंद्रीय
रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. ओ. एल. जाधव तसेच रेशीम तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत
लटपटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रास्ताविकात
डॉ. शिवाजी शिंदे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना, विद्यार्थ्यांना रेशीम उद्योगातील आधुनिक
तंत्रज्ञान, शासनाच्या योजना व प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया
यांचे सखोल ज्ञान देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.
डॉ.
पुरुषोत्तम नेहरकर यांनी रेशीम शेतीचे आर्थिक महत्त्व विशद करत कोष पालन, रोग व्यवस्थापन व उत्पादन वाढीच्या तंत्रांवर मार्गदर्शन
केले. केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. ओ. एल. जाधव यांनी केंद्र व राज्य
शासनाच्या रेशीम शेतीसाठी उपलब्ध असलेल्या विविध अनुदान योजना, प्रशिक्षण व सहाय्याबाबत सविस्तर माहिती दिली. सहाय्यक प्राध्यापक डॉ.
राहुल भालेराव यांनी तुतीची पाने व फळांपासून तयार करता येणाऱ्या विविध मूल्यवर्धित
पदार्थांद्वारे अतिरिक्त उत्पन्न कसे वाढविता येईल, यावर
मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
डॉ. आर. एस. जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डी. एन. मोहोड यांनी मानले. कार्यक्रमास
डॉ. प्रविण राठोड, डॉ. डी. एच. सारंग,
डॉ. पी. के. वाघमारे, प्रा. ज्योती गायकवाड,
डॉ. डी. पी. देशपांडे, श्री. प्रवीण दंडे
यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.


.jpeg)



