भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते “पी.एम.
किसान सन्मान निधी” योजनेअंतर्गत २०व्या हप्त्याचे थेट लाभ हस्तांतरण दिनांक २
ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात
आले. या कार्यक्रमात देशभरातील ९ कोटी ७० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तब्बल २०,५०० कोटी रुपये
वितरित करण्यात आले.
या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे
कृषि महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात सकाळी
११ वाजता आयोजित करण्यात आले होते. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनानुसार
हा कार्यक्रम नियोजित करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.
राजेश कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण, राष्ट्रीय सूचना केंद्राचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री.
देवेंद्रसिंह भारद्वाज, प्रगतशील शेतकरी श्री. मंगेश देशमुख,
श्री. पंडित थोरात, श्री. विद्याधर संघई आदी
मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन
करण्यात आलेल्या विविध विकासात्मक आणि जनकल्याणकारी योजनांचा तसेच पीएम किसान
सन्मान निधीच्या वाटपाच्या निमित्ताने दिलेल्या प्रेरणादायी भाषणाचा थेट
प्रक्षेपणात सहभागी होवून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू व उपस्थितांनी लाभ घेतला.
या प्रसंगी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या भाषणात नमूद केले
की, भारत देश ‘जय जवान, जय किसान’ या तत्त्वावर कार्य
करीत आहे. अन्नसुरक्षा आणि देशसुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून,
माननीय पंतप्रधानांच्या भाषणातून हे स्पष्ट झाले आहे. आज आपला देश
अन्नधान्य व फलोत्पादनात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असला तरीही शेतकऱ्यांचे
समाधान अजूनही अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकरी केंद्रित उपक्रम राबवून उत्पादन
खर्चात कपात करणे आणि उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय
पातळीवर शेती विकास व शेतकरी कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.
विद्यापीठ ‘शेतकरी देवो भवः’ या भावनेतून कार्यरत असून, गेल्या महिन्यात बायोमिक्सचे दोन कोटी रुपयांचे उत्पादन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लावण्यात आला आहे. प्रभावी तंत्रज्ञान प्रसारासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ हा उपक्रम दर महिन्याला राबविला जात आहे, तसेच ‘आठवड्यातून दोन दिवस – शेतकरी व कृषि शास्त्रज्ञ संवाद’ हे ऑनलाईन कार्यक्रमही नियमितपणे आयोजित केले जात आहेत,” असे माननीय कुलगुरूंनी स्पष्ट केले. माननीय पंतप्रधानांचे भाषण हे शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि बळ देणारे ठरत आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकरी मिळून सुमारे दीडशे जणांनी सहभाग नोंदविला.