Friday, August 1, 2025

शेतकरी–शास्त्रज्ञ कृषि संवादातून खरीप हंगामासाठी वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा उपयुक्त सल्ला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि  विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, कीटकशास्त्र विभाग व क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत आयोजित “शेतकरी – शास्त्रज्ञ कृषि  संवाद” या ऑनलाईन कार्यक्रमाचा ५७ वा भाग दिनांक १ ऑगस्ट रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी पिकांचे संरक्षण करताना अनावश्यक कीटकनाशकांचा वापर टाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी कीड नियंत्रणासाठी होणारी अनावश्यक स्पर्धा टाळावी, तसेच पहिली व दुसरी फवारणी जैविक कीटकनाशकांनी करावी, असे सांगितले. याशिवाय त्यांनी मित्र कीटकांची ओळख करून देत त्यांच्या उपयोगांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठाच्या राष्ट्रीय कृषि  संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार यांनी मका व खरीप पिकांच्या अन्नद्रव्यासह समग्र पीक व्यवस्थापनावर भर देत माहिती दिली. पिक रोगशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर आंबाडकर यांनी बायोमिक्सच्या महत्त्वाविषयी सांगत त्याच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन केले. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी हवामानाचा अचूक अंदाज सादर केला. तसेच कृषि  विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी कापूस पिकात आढळणाऱ्या आकस्मिक मर रोगाच्या व्यवस्थापनासंदर्भात उपयुक्त सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी तर आभार डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.

कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. खरीप पिकांसह फळबागांविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्याला शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. केवळ शास्त्रज्ञच नव्हे, तर शेतकरी व शेतकऱ्यांमध्येही संवाद साधला गेला. हा यशस्वी संवादच या कार्यक्रमाचे खरे यश ठरले.