Thursday, August 7, 2025

वनामकृवित ‘नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन तंत्रज्ञानातील उत्कृष्टतेद्वारे अन्न प्रणाली टिकविणे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

 विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पासाठी व्याख्यान लाभदायक.... माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

कृषि क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मूलभूत परिवर्तन आवश्यक  – डॉ. एस. एस. राठोर

माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

प्रमुख मार्गदर्शक डॉ. एस. एस. राठोर 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या कृषिविद्या शाखेअंतर्गत कार्यरत 'परभणी चॅप्टर ऑफ इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमी' यांच्या वतीने भारतामध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन तंत्रज्ञानातील उत्कृष्टतेद्वारे आव्हानांवर मात करणे आणि कृषि अन्न प्रणाली टिकवून ठेवणे (Addressing challenges through excellence in NRM technologies and sustaining the agri food system in India) या विषयावर दिनांक  ६ ऑगस्ट रोजी नाविन्यपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ते म्हणून भारतीय कृषि संशोधन संस्था (IARI), नवी दिल्ली येथील कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. राठोर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांची उपस्थिती लाभली. सहयोगी अधिष्ठाता डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. राहुल रामटेके, कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, उप कुलसचिव डॉ. गजानन भालेराव  हेही कार्यक्रमात सहभागी होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, मातीचा पोत, ओलावा, पिकांची गरज आणि हवामान यांचा विचार करून अचूक खते व पाणी व्यवस्थापन करता येते. यामुळे संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि उत्पादनात वाढ होते. ठिबक व तुषार सिंचन तंत्रांचा वापर केल्यास पाण्याचा अपव्यय कमी करता येतो. पर्जन्य जलसंधारण व पाण्याच्या पुनर्वापराची व्यवस्था ही जलटंचाईवर प्रभावी उपाय ठरतात. स्थानिक जातींचा वापर, आंतरपिके आणि शाश्वत सेंद्रिय पद्धती यामुळे पर्यावरणस्नेही शेतीला चालना मिळते व अन्नसुरक्षा कायम राहते. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अल्पावधीत परिपक्व होणारी व ताण सहन करणारी पिके घेणे, तसेच हरितगृह वायूंमध्ये घट करणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. या व्याख्यानातील माहिती अतिशय उपयुक्त असून कृषि विद्याशाखेतील प्राध्यापक, शास्त्रज्ञ तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधनासाठी उपयोग करून घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी जमिनीची धूप, हवामानातील बदल, आणि अन्नद्रव्यांना कमी प्रतिसाद देणारी पीक परिस्थिती अशा विविध आव्हानांचा उल्लेख केला. या समस्यांवर उपाय म्हणून त्यांनी अचूक शेती तंत्रज्ञान अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

कृषि क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मूलभूत परिवर्तन आवश्यक आहे, यावर भर देत प्रमुख मार्गदर्शक डॉ. एस. एस. राठोर यांनी ‘भारतीय कृषिचे वैज्ञानिक रूपांतरण’ या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. आपल्या सादरीकरणात त्यांनी भारतातील दुष्काळांची माहिती, अन्नटंचाईपासून अन्न सुरळीततेपर्यंतचा प्रवास, हवामान अनुकूल शेती, नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन, आणि कमी उत्पादन असलेल्या क्षेत्रांतील उत्पादकता वाढविण्याचे उपाय यांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, हरित क्रांतीपूर्वी भारताला अनेक दुष्काळांचा सामना करावा लागला आणि अन्नधान्याची तीव्र टंचाई होती. मात्र, १९७० नंतर हरित क्रांतीमुळे अन्न उत्पादनात मोठी वाढ झाली." त्याचबरोबर त्यांनी आधुनिक शेतीसमोरील आव्हानांकडेही लक्ष वेधले – जसे की नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास, पाण्याचा अपव्यय, जैवविविधतेचा अभाव, हवामान बदलाचे परिणाम, उत्पादन खर्चातील वाढ, तांत्रिक सुधारणांना घटत चाललेला प्रतिसाद इत्यादी. ते म्हणाले की, आज जगातील अन्न सुरक्षेसाठी आपण केवळ चार प्रमुख पिकांवर (गहू, तांदूळ, मका व सोयाबीन) अवलंबून आहोत. जैवविविधतेतील घट ही अत्यंत चिंताजनक बाब आहे." तापमानवाढ, अस्थिर पर्जन्यमान, सागरी पातळी वाढ, तसेच किड व रोगांचा प्रादुर्भाव यांचा सामना करण्यासाठी हवामान अनुकूल शेती (CSA) हा एकमेव शाश्वत पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी संरक्षणात्मक शेती पद्धतीच्या जागतिक स्वीकाराचा संदर्भ देत सांगितले की, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ही पद्धत मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. भारतातही सुमारे ३.५ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर संरक्षणात्मक शेतीचे तंत्र वापरले जात आहे. त्यांनी "हर खेत को पानी", "More crop per drop" आणि "परंपरागत कृषि विकास योजना" यांसारख्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याची गरजही अधोरेखित केली. पीक उत्पादनातील राज्य व जिल्हा पातळीवरील तफावत भरून काढण्यासाठी आधुनिक कृषिशास्त्र व योग्य तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी, डॉ. एस. एस. राठोर यांनी शाश्वत कृषि विकासासाठी नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान प्रतिरोधक तंत्रज्ञान, संरक्षणात्मक शेती आणि जैवविविधतेचे संवर्धन हाच काळाचा मार्ग आहे, असे ठामपणे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख विभागाचे प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ मेघा सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ प्रीतम भुतडा यांनी मानले. कृषि विद्याशाखेचे प्राध्यापक, शास्त्रज्ञ तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.


शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार