माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर येथील पदव्युत्तर कृषि
व्यवसाय व्यवस्थापन संस्थेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि अंतिम
वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात व थाटात साजरा करण्यात
आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी
शुभेच्छांचा वर्षाव या समारंभामध्ये अनुभवता आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी भूषवले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक
दिमाखदार झाला. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कृषि महाविद्यायाचे
अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषि जैवतंत्रज्ञानचे अधिष्ठाता
डॉ. अच्युत भरोसे, गळीत धान्य संशोधन केंद्रचे प्रभारी अधिकारी
डॉ. मोहन धुपे, परभणीच्या कृषि महाविद्यालयाचे शिक्षण
प्रभारी डॉ. रणजित चव्हाण, कृषि तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य
डॉ. अशोक घोठमोकळे, आणि कृषि संशोधन केंद्रचे प्रभारी
अधिकारी डॉ. सुधीर सूर्यवंशी यांची उपस्थिती लाभली.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या भाषणात
विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, चिकाटी, सामाजिक जाणिवा आणि नेतृत्व
कौशल्य यांचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी जीवनात
वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान ठेवून नीती मूल्य जपण्याचा सल्ला दिला. डॉ. बाबासाहेब
ठोंबरे आणि डॉ. रणजित चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना व्यावसायिक जीवनातील
आव्हानांना सामोरे जाण्याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी केले.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करत
त्यांना यशस्वी भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्लेसमेंट प्रक्रियेद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये निवड
झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे
मॅनेज, हैदराबाद या संस्थेकडून विद्यार्थिनी कु. प्रियंका कांबळे हिला नवमहिला
उद्योजकता उपक्रमासाठी ५ लाख रुपयांचे फंडिंग मंजूर झाले असून तिचा विशेष सन्मान
करण्यात आला.
निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी शेअर करत शिक्षकांच्या मार्गदर्शनाची आणि मैत्रीतील गोड क्षणांची उजळणी केली. त्यांचे आत्मविश्वासपूर्ण मनोगत सर्वांना भावले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. संस्कृती महाजन, साक्षी इंगोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. वैष्णवी बनकर हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. ज्योती झिरमिरे, श्री. अभिषेक राठोड, प्रा. कृष्णकुमार कुलकर्णी, प्रा. सुधाकर मोरे, श्री. आशिष महेंद्रकर, श्री. पितांबर पिरंगे, श्री. निखिल सूर्यवंशी, श्री. शिवानंद चिकाळे, श्री. विष्णू कांबळे, श्री. वाजिद शेख यांच्यासह प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा समारंभ केवळ निरोपापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या यशाचा एक उत्सव ठरला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने या कार्यक्रमाने सामाजिक भान व सांस्कृतिक मूल्यांची जपणूकही अधोरेखित केली.