Sunday, August 3, 2025

वनामकृविचा “विद्यापीठ आपल्या दारी – तंत्रज्ञान शेतावरी” उपक्रम हदगाव तालुक्यात यशस्वीरीत्या संपन्न

 मौजे ब्रम्हवाडी येथे आयोजित सांगता कार्यक्रमात माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन

वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या “शेतकरी देवो भवः” या भावनेतून सुरू असलेल्या कृषि विस्तार उपक्रमाअंतर्गत “विद्यापीठ आपल्या दारी – तंत्रज्ञान शेतावरी” हा विशेष उपक्रम नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यात आला.

माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली व विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. भागवत देवसरकर यांच्या पुढाकारातून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दिनांक ०१ व ०२ ऑगस्ट २०२५ रोजी विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आला.

दिनांक ०२ ऑगस्ट रोजी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या विविध विकासात्मक आणि जनकल्याणकारी योजनांचा तसेच पीएम किसान सन्मान निधीच्या वाटपाच्या निमित्ताने दिलेल्या प्रेरणादायी भाषणाचा थेट प्रक्षेपणात कार्यक्रमातील मान्यवरांसह सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होवून लाभ घेतला.

मौजे ब्रम्हवाडी येथे आयोजित सांगता कार्यक्रमात विद्यापीठाचे माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना, रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून पर्यायी निविष्ठांचा वापर करण्यावर भर देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यामुळे उत्पादन खर्चात कपात करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे, तसेच शेतकरी केंद्रित उपक्रम राबविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ ‘शेतकरी देवो भवःया भावनेतून कार्यरत असून, गेल्या महिन्यात बायोमिक्सचे दोन कोटी रुपयांचे उत्पादन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लावण्यात आला आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी माननीय आमदार श्री. बाबुराव कदम कोहळीकर, विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य श्री. भागवत देवसरकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके आदी मान्यवरांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमात तण, कीड व रोग व्यवस्थापन या विषयांवर शेतशिवार प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. दिनांक ०१ ऑगस्ट रोजी मौजे घोगरी, तामसा, वडगाव, कोळगाव, कांजरा, शिवणी, वाकळी, धानोरा आणि वाकळी (बु.) या गावांतील शेतांवर प्रत्यक्ष भेट देऊन हळद, ऊस, सोयाबीन, तूर व भाजीपाला पिकांवर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले, तर दिनांक ०२ ऑगस्ट रोजी मौजे उमरी, येवली, पिंपळगाव, राजवाडी, गवतवाडी, चिकाळा व ब्रम्हवाडी या गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हळद, ऊस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला पिकांसाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

या दौऱ्यात डॉ. राकेश आहिरे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. माणिक कल्याणकर तसेच तालुका कृषी अधिकारी श्री. सदाशिव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे कीड व रोग नियंत्रण तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच खरीप हंगामातील पिकांच्या आधुनिक व प्रभावी व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा लाभ घेतला. विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नविन उमेद निर्माण झाली असून, ते अधिक वैज्ञानिक पद्धतीने शेतीकडे वळत असल्याचे चित्र दिसूनआले.