Monday, August 4, 2025

वनामकृवित नैसर्गिक शेती व नवपिढी खतांद्वारे मृदा आरोग्य व्यवस्थापनावर अभिनव व्याख्यानाचे आयोजन

शाश्वत शेती आणि कृषि समृद्धीसाठी शुद्ध बियाणे आणि उत्तम मृदा आवश्यक... माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माजी मुख्य मृदा शास्त्रज्ञ डॉ. दीपक रंजन विश्वास यांचे प्रभावी मार्गदर्शन

माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माजी मुख्य मृदा शास्त्रज्ञ डॉ. दीपक रंजन विश्वास 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयातील मृदा शास्त्र विभाग, तसेच भारतीय मृदा शास्त्र संस्थेच्या परभणी विभागाच्या संयुक्त विद्यमाने “नैसर्गिक शेती व नवपिढी खतांद्वारे मृदा आरोग्य व्यवस्थापन” या विषयावर अभिनव व्याख्यानाचे आयोजन दिनांक ४ ऑगस्ट रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील सिंपोजियम हॉल येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थान माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून नवी दिल्ली येथील भाकृअप-भारतीय कृषि अनुसंधान संस्थेच्या मृदा विज्ञान व कृषि रसायन विभागाचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. दीपक रंजन विश्वास  यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी राष्ट्रीय पातळीवरील मृदशास्त्रज्ञ डॉ. विश्वास यांच्या प्रदीर्घ अनुभवसमृद्ध व्याख्यानाचा विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मृदशास्त्र विभागाचा जवळपास ३० टक्के सहभाग अभियांत्रिकी विभागाच्या अभ्यासक्रमात असून इतर विभागांशीही या विभागाचा महत्त्वपूर्ण संबंध आहे. माननीय कुलगुरू हे अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी मृदशास्त्र विभागाचा पूर्वी सखोल अभ्यास केलेला असून, त्यांचं मार्गदर्शन अत्यंत उपयोगी ठरले आहे.

शाश्वत शेती आणि कृषिसमृद्धीसाठी शुद्ध बियाणे आणि उत्तम मृदा आवश्यक आहे, असे स्पष्ट करताना त्यांनी नमूद केले की, ग्रीन हाऊस व पॉली हाऊस पद्धतीने शेती करताना देखील मृदेचीच आवश्यकता भासते. ज्या मातीमध्ये जे पिकू शकते, तीच पिके घ्यावीत. अन्यथा खतांचा अनावश्यक वापर वाढतो, परिणामी जमीन कमी सुपीक होते आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. याचा थेट परिणाम मानवी जीवनावरही होतो. ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक शेती म्हणजेच रासायनिक खतांचा कमीत कमी वापर, आणि हेच आधुनिक काळातील गरजेचे आहे. आज मृदशास्त्रज्ञही खतांचा वापर कमी करण्याचे मार्ग सांगत आहेत. याच अनुषंगाने केंद्र शासनाने "पीएम-प्रणाम" योजना लागू करून राज्यांना खतांचे उत्पादन व वापर कमी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे.

या अभ्यासपूर्ण व नाविन्यपूर्ण व्याख्यानातून विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आपले ज्ञान आणि कौशल्य वाढवावे, तसेच मराठवाड्यातील शेतीसाठी याचा प्रत्यक्ष उपयोग करावा. 'पोकरा योजना' अंतर्गत सल्ला देताना हे ज्ञान उपयुक्त ठरेल. पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी संशोधनाचे विषय निवडताना, तसेच प्रभावी संशोधन करताना या ज्ञानाचा आधार घ्यावा.

शेवटी, माननीय कुलगुरूंनी डॉ. विश्वास यांचे विद्यापीठास दिलेल्या भेटीसाठी आणि दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राची तसेच नुकतीच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून मिळालेली अ’ दर्जासह अधिस्वीकृती यासंदर्भातील माहिती सादर करून विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीची माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पिकांच्या उत्पादनासाठी मातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या सुमारे दोन-तृतीयांश माती अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे खराब झाली आहे. यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर वाढविणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर, पुरेशी अन्नधान्य उत्पादकता सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेतीसाठी किती क्षेत्र आवश्यक ठरेल, हे ठरवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले.

मुख्य मार्गदर्शक डॉ. दीपक रंजन विश्वास यांनी माती ही सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची असून ती सर्वांना सेवा देते, असे प्रतिपादन केले. त्यांनी शेती व्यवसायातील प्रमुख अडचणींवर प्रकाश टाकत देशातील मातीच्या सुपीकतेतील घट दर्शवली. १९५० च्या दशकात केवळ नत्राच्या स्वरूपात खतांचा वापर केला जात होता. मात्र, कालांतराने सर्व अन्नघटकांचा प्रमाणात किंवा अति प्रमाणात वापर सुरू झाला. आजच्या घडीला रासायनिक खतांना पिकांचा प्रतिसाद कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाश्वत मृद व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना, संतुलित अन्नघटकांचे महत्त्व आणि त्यांच्या कार्यकारणभावाचे सखोल विश्लेषण त्यांनी केले. त्यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पनाही स्पष्ट करत बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, वापसा, मल्चिंग व वनस्पती संरक्षण या घटकांचा मातीच्या आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामावर भर दिला. हरित क्रांतीनंतर जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता सातत्याने वाढत गेली आहे. यामागील कारणांमध्ये केवळ नत्र स्फुरद पालाश वरचा अतिरेकी भर, सेंद्रिय खतांचा अपुरा वापर, तसेच पिकांचे अवशेष जाळणे किंवा काढून टाकणे यांचा समावेश होतो. डॉ. बिस्वास यांनी सांगितले की भारतातील सुमारे ३०% लागवडीयोग्य जमीन ऱ्हास पावली आहे. पाण्यामुळे आणि वाऱ्यामुळे होणारी धूप, तसेच रासायनिक, भौतिक व जैविक घटकांमुळे जमिनीचा दर्जा सतत घसरत आहे. भारतातील मातीतील सेंद्रिय कार्बन १% वरून ०.३% पर्यंत खाली आल्याचे त्यांनी नमूद केले. शाश्वत मृद व्यवस्थापनासाठी त्यांनी जमिनीची धूप टाळणे, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवणे, पोषणचक्र व समतोल राखणे, क्षारता व अल्कलिनतेचे व्यवस्थापन करणे, मातीतील जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि जल व्यवस्थापनात सुधारणा करणे आदी शिफारसी दिल्या.

पोषण व्यवस्थापनासाठी आधुनिक उपायांचा उल्लेख करत त्यांनी नॅनो खतांचे फायदे, बायोफर्टिलायझर्स, खतांचे सुधारित प्रकार व समन्वित पोषण व्यवस्थापन (INM) यांची गरज अधोरेखित केली. शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय व जैविक पर्यायांचा वापर केल्यास मृद आरोग्य सुधारता येईल व उत्पादनक्षमता टिकवून ठेवता येईल.

प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. यावेळी त्यांनी इंडियन सोसायटी ऑफ सोईल सायन्स परभणी चॅप्टर च्या कार्याचे आणि उद्देशाची मांडणी केली.

कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख तथा पीसीआयएसएस अध्यक्ष डॉ. हरिहर कौसडीकर, उपाध्यक्ष डॉ. अनिल धमक, सल्लागार डॉ. रामप्रसाद खंदारे, सचिव डॉ. सुदाम शिराळे, संयुक्त आयोजक सचिव डॉ. संतोष चिकशे, कोषाध्यक्ष डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ.सुरेश वाईकर,  डॉ. महेश देशमुख डॉ   स्वाती झाडे, डॉ संतोष पिल्लेवाड यांच्यातर्फे करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ  रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार डॉ. सुदाम शिराळे यांनी मानले. कार्यक्रमास विभागातील पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.