Saturday, January 3, 2026

वनामकृविच्या लिहाखेडी कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व माननीय महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल (भाप्रसे) यांची भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लिहाखेडी (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील कृषी महाविद्यालयास आणि राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या माननीय महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल (भाप्रसे) यांनी दिनांक २ डिसेंबर २०२६ रोजी भेट दिली. भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयातील अधिकारी आणि विद्यार्थ्यासोबत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. किशोर शिंदे, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. एस. बी. पवार, केव्हीके प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व भौतिक सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने या महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांतील त्रुटींची पूर्तता करून त्यांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, असे नमूद केले. पुढे बोलताना माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना समस्या सकारात्मक दृष्टीने स्वीकारून त्यावर मात करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिक्षकांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, गुरु होण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही; त्यामुळे या संधीचे संधीत रूपांतर करावे. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देणे आवश्यक असून काम करताना सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच विद्यापीठाने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. या ठिकाणी कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजूर यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.

माननीय महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल (भा.प्र.से.) यांनी या महाविद्यालयाचे कृषि परिषदेकडे प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव शासनाच्या निदर्शनास आणून ते मार्गी लावण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. त्या पुढे म्हणाल्या की, केवळ कार्यालयात बसून बाहेरील समस्या समजत नाहीत; प्रत्यक्ष भेटी व पाहणीमुळे अनेक अडचणी लक्षात येतात आणि त्या त्या ठिकाणी सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. कृषी महाविद्यालय लिहाखेडीच्या प्रस्तावांसाठीही शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रारंभी सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सुर्यकांत पवार यांनी कार्यालयाचा लेखाजोखा सादर करत कृषी महाविद्यालय लिहाखेडीच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले.

या बैठकीस कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीही उपस्थित होते. त्यांच्याशीही मान्यवरांनी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली, त्यानंतर प्रक्षेत्रावरील गहू ‘फुले समाधान’ पैदासकार पिकाची पाहणी करण्यात आली. तसेच जैविक औषधी व जैविक खते संशोधन व उत्पादन प्रयोगशाळेस भेट देऊन विविध जैविक उत्पादनांची माहिती घेण्यात आली. ट्रायकोकार्ड निर्मिती प्रक्रियेचीही माहिती घेण्यात आली. यावेळी महासंचालकांनी या कार्याचे कौतुक केले व यासाठी लागणाऱ्या स्वतंत्र इमारतीसाठी आवश्यक पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. सी. बी. पाटील, डॉ. आशिष बागडे, डॉ. ज्ञानदेव मुटकुळे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य दत्ता मुळे, श्री. संतोष ढगे, श्री रामेश्वर ठोंबरे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार डॉ. सुरेखा कदम यांनी केले.












Friday, January 2, 2026

वनामकृविच्या करडईच्या दोन सुधारित वाणांना केंद्र शासनाची अधिकृत मान्यता

 उच्च तेलांश व कमी खर्चाचे करडई वाण शेतकऱ्यांसाठी लाभदायक — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (AICRP on Safflower) मार्फत विकसित करण्यात आलेल्या करडईच्या दोन सुधारित जातींना केंद्र शासनाकडून अधिकृत अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचना क्र. S.O. 6123(E), दिनांक ३१ डिसेंबर २०२५ अन्वये पीबीएनएस २२१ (परभणी सुजलाम) आणि पीबीएनएस २२२ (परभणी सुफलाम) या दोन करडई वाणांना अधिसूचित वाण म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हे दोन्ही वाण झोन – १ साठी (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा) शिफारसीत करण्यात आले असून कोरडवाहू तसेच सिंचित परिस्थितीत लागवडीस योग्य आहेत.

यानिमित्त बोलता माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, या नव्या वाणांच्या प्रसारणामुळे करडईच्या  उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास निश्चितच मदत होणार असून शेतकऱ्यांना दर्जेदार, अधिक तेलांश असलेले उत्पादन मिळेल. परिणामी उत्पादन खर्चात घट, उत्पन्नात वाढ आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडून येईल, अशी त्यांनी आशा व्यक्त केली. तसेच हे वाण कोरडवाहू व बदलत्या हवामानाच्या परिस्थितीतही उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की, या दोन नवीन वाणांच्या प्रसारामुळे करडई पिकाचे उत्पादन व उत्पादनातील स्थैर्य वाढण्यास मोठी मदत होणार असून, बदलत्या हवामान परिस्थितीतही शेतकऱ्यांना हमखास व शाश्वत उत्पादन मिळू शकेल. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. तसेच करडई पिकाच्या क्षेत्रवाढीस आणि राज्यातील तेलबियाणे उत्पादन वाढीसही या वाणांचा मोलाचा वाटा राहणार आहे.

या महत्त्वपूर्ण यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच संशोधन संचालक डॉ खिजर बेग यांचे मोलाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन व सततच्या सहकार्याबद्दल अखिल भारतीय करडई संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आर. आर. धुतमल यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

वाणांची वैशिष्ट्ये

करडईचे हे दोन सुधारित वाण सन २०२५ मध्ये विकसित केले असून कोरडवाहू तसेच बागायती शेतीसाठी योग्य असून शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पादन व उत्पन्नवाढीच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहेत.रब्बी हंगामात लागवडीस योग्य असलेल्या या वाणांची परिपक्वता कालावधी १२५ ते १३० दिवस इतका आहे.

पीबीएनएस–२२१ (परभणी सुजलाम) - या वाणाची बागायती परिस्थितीत उत्पादन क्षमता १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर असून कोरडवाहू परिस्थितीत १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर आहे. या वाणामध्ये मर रोग, अल्टरनेरिया रोग तसेच मावा किडीस सहनशीलता असून कोरडवाहू व बागायती दोन्ही परिस्थितीस उत्तम अनुकूलता आहे. या वाणामधील तेलाचे प्रमाण सुमारे ३४ टक्के आहे.

PBNS 221 Single Plant

PBNS 221 Field view

पीबीएनएस–२२२ (परभणी सुफलाम) - हा वाण मर (फ्युजेरियम विल्ट) रोगास मध्यम प्रतिकारक असून त्याची उत्पादन क्षमता देखील बागायतीत १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर व कोरडवाहूत १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर आहे. या वाणामध्ये तेलाचे प्रमाण सुमारे ३४.३८ टक्के असून तोही कोरडवाहू व बागायती दोन्ही परिस्थितीस अनुकूल आहे.

PBNS 222 Single Plant

PBNS 221 Field view


विद्यापीठ स्तरावर ‘वनामकृवि नैसर्गिक शेती – पवित्र शेती मॉडेल फार्म’ : संशोधन, प्रात्यक्षिके व प्रसाराला चालना

नैसर्गिक शेती ही काळाची गरज; शेतकरी व शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ती स्वीकारावी – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


महाराष्ट्र व गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल, विद्यापीठाचे माननीय कुलपती तसेच नैसर्गिक शेतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक श्री. आचार्य देवव्रतजी यांच्या मार्गदर्शनानुसार व माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे नैसर्गिक शेतीचा वैज्ञानिक व शाश्वत मॉडेल विकसित करण्याचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ स्तरावर ३ एकर क्षेत्रावर ‘माननीय कुलगुरू नैसर्गिक शेती – पवित्र शेती मॉडेल फार्म’ विकसित करण्यात येत आहे. तसेच विद्यापीठाच्या १४ संशोधन केंद्रांमध्ये व १२ कृषी विज्ञान केंद्रांमध्ये प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर ‘नैसर्गिक शेती- पवित्र शेती मॉडेल फार्म’ स्थापन करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्राशी संलग्न ३ शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली आहेत. अशा प्रकारे एकूण १०५ ‘वनामकृवि एक एकर नैसर्गिक शेती मॉडेल फार्म’ विकसित करण्याचे काम सुरू असून विद्यापीठाच्या अंतर्गत घटक व संलग्न महाविद्यालये यांच्या माध्यमातून ५९ ‘नैसर्गिक शेती – पवित्र शेती मॉडेल फार्म’ विकसित करण्याचे नियोजित असून एकूण १६४ ‘वनामकृवि नैसर्गिक शेती- पवित्र शेती मॉडेल फार्म’ विकसित करण्यात येणार आहेत. या क्षेत्रावर नैसर्गिक शेतीची मॉडेल्स, प्रात्यक्षिके व संशोधन प्रयोग राबविले जात आहेत. 

हा उपक्रम कमी खर्चिक, शाश्वत, पर्यावरणपूरक व शेतकरी–अनुकूल शेती पद्धतीचे वैज्ञानिक प्रमाणीकरण, प्रात्यक्षिके व प्रसारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या मॉडेलमध्ये देशी नैसर्गिक शेतीच्या तत्त्वांचा व आधुनिक संशोधनाधारित पद्धतींचा समन्वय साधण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील सिम्पोजियम हॉल येथे सेंद्रिय शेती प्रकल्पाच्या वतीने विद्यापीठाच्या घटक  व सलग्न महाविद्यालयांतील शिक्षकवर्गीय अधिकारी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सेंद्रिय शेती संशोधन योजनेचे मुख्य अन्वेषक डॉ. आनंद गोरे, प्रगतशील शेतकरी श्री नरेश शिंदे, श्री विश्वनाथ होळगे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी माननीय कुलगुरूंनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, माननीय राज्यपाल श्री. आचार्य देवव्रतजी यांनी मांडलेले नैसर्गिक शेतीचे मॉडेल संपूर्ण देशात स्वीकारले जात आहे. ही शेतीपद्धती आपण समजून घेऊन तिचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सूचित केले. महाराष्ट्रातील शेतकरी प्रगत असून महाराष्ट्रातील शेती देशाला दिशादर्शक ठरते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती स्वीकारणे अधिक सोपे जाणार आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती स्वेच्छेने स्वीकारल्यास ती अधिक सोपी होईल आणि अधिक उत्पादन मिळविता येईल, असे त्यांनी सांगितले.

शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसोबत अधिक संवाद साधून नैसर्गिक शेतीविषयीचे ज्ञान आणि माहिती देवाणघेवाण करावी, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. नैसर्गिक शेतीतून फायदा होईल की तोटा होईल, ही संकल्पना आता संपुष्टात आली असून नैसर्गिक शेती स्वीकारण्याची मानसिकता समाजात रुजत आहे. नैसर्गिक शेती व निसर्ग यातून मिळणारे समाधान अद्वितीय असून यामुळे आरोग्य व पर्यावरण दोन्ही उच्च दर्जाचे राहते. त्यामुळे नैसर्गिक शेती ही सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने काळाची गरज बनली आहे.

सध्या रासायनिक शेतीमुळे उत्पादन खर्च वाढत आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करण्याची संकल्पना मागे पडून रसायनमुक्त शेती पुढे येत आहे. नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास खर्चात बचत होऊन कर्जमुक्त शेती आणि शेतकरी कल्याण साध्य होऊ शकते. नैसर्गिक शेतीबाबत माननीय राज्यपालांचा संदेश आपण सर्वांनी समजून घ्यावा. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की नैसर्गिक शेती स्वीकारावी, ती समजून घ्यावी आणि त्यासाठी अधिकाधिक प्रशिक्षण घ्यावे.

नैसर्गिक शेती ही नवीन नसून जुनी आणि समृद्ध तंत्रज्ञानावर आधारित आहे. भारतातील देशी वाण समृद्ध असून त्यांचा विकास करून त्यांचा अवलंब करणे गरजेचे आहे. नैसर्गिक शेतीत प्रगती हळूहळू होईल, पण निश्चितच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सन २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठ दरवर्षी आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी रोजी महिला शेतकरी दिन साजरा करते. या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ विद्यापीठातील सर्व महाविद्यालये व संशोधन केंद्रांनी शेतकरी महिलांच्या कल्याणासाठी वर्षभरासाठी विविध उपक्रम व योजनांचा आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की, विद्यापीठ नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात अधिकाधिक संशोधन प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने सातत्याने कार्य करत असून, या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध, व्यवहार्य व उपयुक्त शिफारसी उपलब्ध करून दिल्या जातील. या शिफारसींच्या आधारे नैसर्गिक शेती अधिक उत्पादनक्षम, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व पर्यावरणपूरक बनवून ती दीर्घकालीनदृष्ट्या शाश्वत करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल, तसेच मातीची सुपीकता, पाणी व पर्यावरणाचे संवर्धन साध्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नैसर्गिक शेतीचे मानवी जीवनातील तसेच पर्यावरणीय दृष्टीने असलेले बहुआयामी महत्त्व सविस्तरपणे विशद केले. नैसर्गिक शेतीमुळे मातीची सुपीकता टिकून राहते, पाण्याची गुणवत्ता सुधारते, जैवविविधतेचे संवर्धन होते आणि रासायनिक खत-कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन त्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होतो आणि समाजाला आरोग्यदायी, विषमुक्त अन्न मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी नमूद केले की माननीय राज्यपालांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा प्रचार व अंमलबजावणी गुजरात, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात माननीय राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात माननीय कुलगुरू यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येत असलेल्या नैसर्गिक शेती मॉडेलच्या आराखड्यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमात विद्यापीठाच्या घटक व संलग्न सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य तसेच प्रत्येक महाविद्यालयातील दोन शिक्षक वर्गीय शास्त्रज्ञ प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. अविनाश राठोड यांनी मानले.

तांत्रिक सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.यामध्ये डॉ. आनंद गोरे यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पना व घटक यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. पपिता गौरखेडे यांनी मृदा आरोग्य व अन्नद्रव्य व्यवस्थापन, डॉ. एम. आर. मोरे यांनी मृदा व जलसंधारण, तर डॉ. एस. एस. धुरगुडे आणि डॉ. ए. जी. लाड यांनी कीड व कीड व्यवस्थापनावर सविस्तर माहिती दिली.

दुपारनंतर डॉ. एम. जी. पाटील यांनी रोग व्यवस्थापन, डॉ. पी. व्ही. पडघण यांनी पशुसंवर्धन, तर डॉ. डी. डी. टेकाळे यांनी नैसर्गिक शेतीतील यांत्रिकीकरणावर मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेती प्रमाणपत्राबाबत श्री. अतुल पाटील यांनी माहिती दिली.

यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र येथील विविध संशोधन प्रयोग, नैसर्गिक शेती मॉडेल फार्म तसेच गांडूळखत निर्मिती संचास भेट दिली. यावेळी डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. अविनाश राठोड, डॉ. अनंत लाड, डॉ. तेजस्विनी कच्छवे, डॉ. प्रीतम भुतडा व डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी प्रशिक्षणार्थींना सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रात्यक्षिक प्रक्षेत्रास भेट देऊन शेतकरी संवाद सत्रात सहभाग घेतला. यावेळी श्री. नरेश शिंदे व श्री. विश्वनाथ होळगे यांनी आपले अनुभव कथन केले.













नैसर्गिक शेती मॉडेल फार्म तसेच गांडूळखत निर्मिती संचास भेट









वनामकृविद्वारा ३ जानेवारी रोजी महिला शेतकरी मेळाव्याचे बदनापूर येथे आयोजन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, उमेद, माविम, कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी मेळावा–२०२६ चे आयोजन शनिवार, दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथे करण्यात आले आहे. हा मेळावा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पद्मश्री मा. श्रीमती राहीबाई सोमा पोपेरे, पुणे येथील कृषी परीषदेच्या महासंचालक मा. श्रीमती वर्षा लड्डा- उंटवाल (भा.प्र.से.), जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. श्रीमती आशिमा मित्तल (भा.प्र.से.) व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती मिन्नू पी. एम. (भा.प्र.से.) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

मेळाव्यास विद्यापीठातीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ खिजर बेग, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, नियंत्रक श्री अनंत कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री गहिनीनाथ कापसे, विद्यापीठाचे संजय पाटील, माविमचे श्री संजय गायकवाड, आत्माचे श्री संजय अगवान यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याबरोबरच संशोधक, कृषी विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून महिलांसाठी उपयुक्त कृषी तंत्रज्ञान, उद्योजकता, स्वयंसहायता गट व कृषीपूरक व्यवसाय याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असून जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. डी. सोमवंशी, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, उमेदीचे श्री शैलेश चौधरी आणि बायफचे श्री प्रवीण खोसे यांच्याद्वारे करण्यात आले आहे.


Thursday, January 1, 2026

माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत उपक्रम देऊळगाव दुधाटे येथे उत्साहात संपन्न

 नैसर्गिक व सेंद्रिय शेती ही आजच्या काळाची अपरिहार्य गरज — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

देऊळगाव दुधाटे (ता. पूर्णा) येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून आयोजित माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत ” हा अभिनव उपक्रम दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नुकतेच कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित उद्यान पंडित श्री प्रताप काळे, तसेच पोलिस पाटील संघटनेचे मराठवाडा विभागाध्यक्ष श्री बालासाहेब हिंगे उपस्थित होते.

याशिवाय पोलिस पाटील शिवाजीराव दुधाटे, उपसरपंच डिगांबर दुधाटे, चेअरमन तुकाराम दुधाटे, तंटामुक्ती अध्यक्ष रंगनाथदादा दुधाटे, माजी सरपंच पांडुतात्या दुधाटे, भगवानराव दुधाटे, अच्युतराव दुधाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांचे गावात आगमन होताच विद्यार्थिनींनी लेझीमच्या गजरात त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

यानंतर मान्यवरांना गावातील स्वच्छ, सुंदर व हरित वैकुंठधाम स्मशानभूमी दाखविण्यात आली. या उपक्रमाचे विशेष कौतुक करत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच शाळेतील सेंद्रिय परसबागेचे उद्घाटन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती ही केवळ पर्याय नसून आजच्या काळाची अपरिहार्य गरज आहे, असे ठामपणे सांगितले. वाढते रासायनिक प्रदूषण, जमिनीची होत चाललेली अधोगती आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होतो, मातीची सुपीकता टिकून राहते आणि शाश्वत शेतीचा मार्ग खुला होतो, असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, फक्त अभ्यासापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी आपले छंद, कला, क्रीडा व सामाजिक जाणिवा विकसित कराव्यात. छंदातून सर्जनशीलता वाढते, व्यक्तिमत्त्व घडते आणि मानसिक संतुलन टिकते. आत्मविश्वास, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावरच यश प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक डॉ. अनिल गोरे यांनी केले. यावेळी गावातील उत्कृष्ट कार्य करणारे गोविंद क्षीरसागर, प्रकाश भोसले, पंढरीनाथ शिंदे, पांडुरंग बकाल, गोविंदराव दुधाटे, मोतीराम दुधाटे, तरुण उद्योजक विष्णुभाऊ दुधाटे, ऊसाचे भरघोस उत्पादन घेणारे कृष्णा दुधाटे व रोहिदास दुधाटे, तसेच मुख्याध्यापक आबनराव पारवे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्धव दुधाटे, गोविंद दुधाटे, पंढरीनाथ शिंदे, विष्णू दुधाटे, मोतीराम दुधाटे, बळिराम दुधाटे, प्रकाश दुधाटे, आत्माराम दुधाटे, व्यंकटदादा दुधाटे, रामेश्वर दुधाटे व अशोक दुधाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.





वनामकृवित नववर्ष संवाद बैठक : भविष्यातील आव्हाने व दिशा यांवर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात नववर्षानिमित्त विद्यापीठातील शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यातील भविष्यातील आव्हाने आणि दिशा याविषयी दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

या वेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या संवाद बैठकीत प्रमुख मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू यांनी नमूद केले की, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वांना एकत्र शुभेच्छा देण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तसेच विद्यापीठातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निरोप देण्यासाठी दर महिन्याच्या शेवटी अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना शुभेच्छा द्याव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

विद्यापीठाने मागील वर्षात अनेक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असूनही सांघिक व वैयक्तिक क्षमतेने कार्य करून या यशामध्ये सर्वांनी योगदान दिले आहे. असेच प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून एकसंघ व समर्पण भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मागील वर्षी विद्यापीठात दीक्षांत समारंभ, कुलगुरू परिषद यांसारखे मोठे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. विद्यापीठाने आजपर्यंत कृषि शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले असून आतापर्यंत एकूण १,२९,२८४ विद्यार्थ्यांना कृषि शिक्षण प्रदान केले आहे आणि शेतकऱ्यांसाठी सक्षम व प्रभावी मनुष्यबळ घडवले आहे. शिक्षण बळकटीकरणासाठी नव्याने चार महाविद्यालयांची सुरुवात करण्यात आली असून विद्यापीठात ज्या बाबींमध्ये कमतरता आहे त्याची पूर्तता करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.

नुकतेच विद्यापीठातील विविध शाखांतील ४० विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवली आहे. त्यापैकी दहा विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या जेआरएफ परीक्षेची प्राथमिक पातळी उत्तीर्ण केली असून ते पुढील परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. येत्या काळात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया होणार असल्याने विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन तयारी करावी, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी ‘अविष्कार’ तसेच राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यश संपादन केले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा आणि यशस्वी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. हे विद्यापीठ कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या निकषांनुसार देशातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये असून भारतीय कृषि संशोधन परिषदेने विद्यापीठाला ‘अ’ दर्जाची अधिस्वीकृती दिली आहे. याबरोबरच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही विद्यापीठाला मिळाले आहेत. आपण ‘ए’ ग्रेड विद्यापीठाचे विद्यार्थी आहात याचा अभिमान बाळगा, पण अहंकार नको, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, स्वबुद्धी व धैर्याने कार्य करून अडचणींवर मात करावी. विद्यापीठ येत्या जानेवारी अखेरीस ‘अविष्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. विद्यापीठ प्रत्येक कार्य वेगळ्या व नावीन्यपूर्ण पद्धतीने करत असल्यामुळे वरिष्ठ पातळीवरून योजनांना व निधीला प्राधान्य मिळते, असेही त्यांनी नमूद केले. नुकतेच ‘कृषि समृद्धी’ योजनेअंतर्गत १३ नवीन प्रकल्प मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रत्येक कामासाठी योग्य तंत्र आवश्यक असून त्याचा समतोल वापर करावा, तसेच कार्यक्रमांची काटेकोर निगराणी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्तम नागरिक बनावे, अहंकार टाळावा, ज्ञानाचा गर्व करू नये आणि विनम्रतेने वाटचाल करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

शेवटी त्यांनी विद्यापीठाचे यश हे सामूहिक असल्याचे सांगून, पुढील पन्नास वर्षे स्मरणात राहील असे कार्य करावे, असे आवाहन केले व सर्वांना येणारे वर्ष सुख, समृद्धी, आनंद व आरोग्याचे जावो, अशा शुभेच्छा दिल्या.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी ‘स्वयम’ मध्ये यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मेंटोरचे कौतुक करून अभिनंदन केले. विद्यापीठाने राष्ट्रीय पात्रता परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असून, मात्र जेआरएफ व एसआरएफ मध्येही विद्यापीठाने अधिकाधिक यश संपादन करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. यासाठी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अध्यापन व मार्गदर्शनासाठी प्राधान्य द्यावे तसेच आपसात समन्वय ठेवावा, असे त्यांनी सुचविले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की विद्यापीठाच्या संशोधनामधून विकसित झालेल्या कापूस, तूर व सोयाबीन पिकांच्या जाती महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असून देशपातळीवरही चमकत आहेत. या निमित्ताने त्यांनी पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी दर्जेदार विषय व प्रकल्प निवडावेत आणि राष्ट्रीय स्तरावरील संशोधक बनावे, असे आवाहन केले.

या बैठकीत स्वयम पोर्टलच्या कार्याची प्रमुख जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळणारे डॉ. प्रविण कापसे तसेच इतर सर्व सहकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. स्वयम पोर्टलची माहिती सांगताना डॉ. प्रविण कापसे यांनी नमूद केले की, नवीन शैक्षणिक धोरण २०२० व सहाव्या अधिष्ठाता समितीच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा एक भाग म्हणून स्वयम पोर्टलद्वारे ऑनलाइन १० क्रेडिट्सची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील तिसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.

महाराष्ट्रातून टक्केवारीच्या तुलनेत परभणी कृषि विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परभणी कृषि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याबरोबरच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मेंटर्सपैकी परभणी कृषि विद्यापीठाच्या सात मेंटर्सना स्वयमकडून “बेस्ट परफॉर्मिंग मेंटर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले, तर आभार सह्याद्री अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नरेंद्र कांबळे व डॉ. धीरज पाथ्रीकर यांनी परिश्रम घेतले. या संवाद बैठकीस विद्यापीठातील सर्व विभागांचे प्रमुख प्राध्यापक तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.