Saturday, January 18, 2014

वाढत्‍या लोकसंख्‍येला पुरेसे अन्‍नासाठी जैवतंत्रज्ञानाची भुमिका महत्‍वाची .. शास्‍त्रज्ञ डॉ बी दिनेशकुमार

     जैवतंत्रज्ञानाचा वापर आपण विविध क्षेत्रात मोठया प्रमाणात करीत असुन वैद्यकीय क्षेत्रात अनेक आजारावरील उपाय यामुळे शक्‍य झाला आहे. स्‍टेम सेल, नॅनो पार्टीकल्‍स, प्रोबोयाटीक्‍स, जी एम पिके आदी जैवतंत्रज्ञानाचाच भाग असुन वाढत्‍या लोकसंख्‍येला पुरेसे अन्‍न पुरवण्‍यासाठी आपणास जैवतंत्रज्ञानाचा वापर करावाच लागणार आहे, असे मत हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय पोषण संस्‍थेचे उपसंचालक तथा शास्‍त्रज्ञ डॉ बी दिनेशकुमार यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दि 17 जानेवारी रोजी मानवाच्‍या अन्‍न व आरोग्‍यात जैवतंत्रज्ञानाची भुमिका या विषयावर त्‍यांचे व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ बी बी भोसले हे होते तर गोळेगांव कृषि महावि़द्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ विलास पाटील, अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डॉ पी एन सत्‍वधर व गृ‍हविज्ञान महाविद्यालयाच्‍या डॉ विजया नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, प्रत्‍येक तंत्रज्ञान वापरतांना फायदे व तोटे असतात, कोणतेही तंत्रज्ञान हे परिपुर्ण नसते. बोंडअळयामध्‍ये बी टी कापसास प्रतीकारक्षमता निर्माण होऊ नये म्‍हणुन बी टी कापसाच्‍या सभोवताली नॉन बी टी कापसाच्‍या झाडांची लागवड करण्‍याची शिफारस करण्‍यात आली होती, परंतु अधिकत्‍तर शेतक-यांनी यांचा अवलंब केला नाही. बी टी कापसामुळे देशाच्‍या कापसाचे उत्‍पादन वाढण्‍यास मदत झाली, त्‍यामुळे देशात कापसाच्‍या बाबीत पांढरी क्रांती घडुन आली. 
    कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ पी आर झंवर यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्‍यापक व कर्मचारी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते.