Sunday, January 12, 2014

विविध स्‍पर्धापरिक्षेत यशस्‍वी झालेल्‍या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पदवीधरांचा सत्‍कार समारंभ संपन्‍न

 मार्गदर्शन करतांना नांदेड महानगर पालिकेचे अप्‍पर आयुक्‍त तथा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मा श्री रामजी गगरानी
मार्गदर्शन करतांना नांदेडचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी मा श्री दिलीपजी स्‍वामी
महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्‍या व विविध स्‍पर्धापरिक्षांमध्‍ये विविध पदावर निवड झालेल्‍या यशस्‍वी कृषि पदवीधर व स्‍पर्धामंचाचे सदस्‍य
अध्‍यक्षीय भाषण करतांना कृषि महावि‍द्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले 
 ................................................................................
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या स्‍पर्धा मंचाच्‍या वतीने आज दि 12 जानेवारी 2014 रोजी महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्‍या व विविध स्‍पर्धा परिक्षांमध्‍ये विविध पदावर निवड झालेल्‍या यशस्‍वी कृषि पदवीधरांचा सत्‍कार सभारंभाचे आयोजन कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन नांदेड महानगर पालिकेचे अप्‍पर आयुक्‍त तथा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मा श्री रामजी गगरानी, नांदेडचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी मा श्री दिलीपजी स्‍वामी, सहायक आयुक्‍त डॉ विजयकुमार मुंढे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर स्‍पर्धामंचाचे अध्‍यक्ष श्री अमोल राठोड, प्रा पी आर झंवर, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ जे पी जगताप, श्री कनके सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठातील कृषि पदवीधर मागील तीन वर्षात विविध पदावर निवड झालेले साधारणता 300 गुणवंताच्‍या सत्‍कार समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते. यात राज्‍यसेवा परिक्षेत यश प्राप्‍त करून उपअधिक्षक पोलिस अधिकारी, उपजिल्‍हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, पोलिस उपनिरीक्षक, कृषि अधिकारी तसेच भारतीय कृषि संशोधन सेवा, महाराष्‍ट्र वनसेवा, बॅकींग सेवा आदी मध्‍ये निवड झालेल्‍या गुणवंताचा समावेश होता.
नांदेड महानगर पालिकेचे अप्‍पर आयुक्‍त तथा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी श्री रामजी गगराणी आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि शिक्षणात महिलांचे प्रमाण वाढत असुन त्‍यांचे सामर्थ्‍य समाजापुढे येत आहे. प्रशासनात ही ते आपला ठसा उमठवत आहेत, ही आनंदाची बाब आहे. आज कृषि पदवीधर विविध पदावर कार्यरत असले तरी त्‍यांची आपल्‍या मातीशी व विद्यापीठाशी जवळीकता आहे.
अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्री दिलीप स्‍वामी मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, कृषि विद्यापीठातील ग्रंथालय व चांगल्‍या शैक्षणिक वातावरणाचा लाभ विद्यार्थ्‍यांनी घ्‍यावा. विद्यापीठात सध्‍या कार्यरत असलेला स्‍पर्धामंच हा एक चांगला व्‍यासपीठ विद्यार्थ्‍यांना प्राप्‍त झाला असुन याचा लाभ घेऊन देश पातळीवर स्पर्धापरिक्षेत यश प्राप्‍त करू शकता. यशासाठी विद्यार्थ्‍यांनी ध्‍येय निश्‍चती, सकारत्‍मकता, दृढ आत्‍मविश्‍वास, योग्‍य नियोजन, कठीण परिश्रम, संयम व शेवटी यश असे सप्‍तपदीचे अनुकरण करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय भाषणात कृषि महावि‍द्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले म्‍हणाले की, विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या मा‍नसिकेतेमध्‍ये काळाप्रमाणे आमुलाग्र बदल झाला असुन करिअरकडे वस्‍तुनिष्‍ठपणे पाहात आहेत. विद्यापीठातील पदवीधर राज्‍यातील प्रशासनात विविध पदावर काम करतांना कृषि विकासास निश्चितच प्राधान्‍य देतात. कृषि विद्यापीठाच्‍या पदवीधरांनी प्रशासनात शेतकरी केंद्रबिंदु मानुन कार्य करावे, असा सल्‍ला ही त्‍यांनी दिला.
राज्‍यसेवा परिक्षेत महाराष्‍ट्रात मागासवर्गीयात प्रथम आलेले उपजिल्‍हाधिकारी अविशकुमार सोनने, जनार्धन विधाते, महाराष्‍ट्र वनसेवा परिक्षेत राज्‍यात प्रथम आलेल्‍या पुष्‍पा पवार, कृषि अधिकारी प्रशांत जाधव, पोलिस उपनिरीक्षक आबासाहेब पाटील यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाच्‍या प्रारंभी स्‍वामी विवेकानंद व मॉ जिजाऊ यांच्‍या जयंती निमित्‍त मान्‍यवरांच्‍या हस्‍ते त्‍यांच्‍या प्रतीमेचे पुजन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक स्‍पर्धामंचाचे अध्‍यक्ष अमोल राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल भालेकर, दादासाहेब हाकाळे व स्‍वाती कदम हयांनी केले तर आभार प्रदर्शन देवानंद शेटे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्‍पर्धमंचाच्‍य सदस्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यीनी वर्ग, विविध पदावर निवड झालेले गुणवंत मोठया संख्‍येने उपस्थित होते.