Friday, July 13, 2018

हुमणी किड व्यवस्थापनाकरिता वनामकृविच्‍या किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

सध्या मराठवाडयामधील सर्व जिल्हयात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी मणीचे सुप्त अवस्थेतील भुंगे जमिनीतुन बाहेर पडत आहेत. हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात. प्रौढ अवस्था ही बाभुळ, कडुलिंब, बोर आदी झाडावर उपजिविका करतात. तर अळी अवस्था पिकांच्या मुळा कुडतूडुन नुकसान करते. प्रौढ भुंगेरे जमिनीतुन निघाल्यानंतर ते बाभुळ, कडुलिंब, बोर आदी झाडावर राहतात व त्यांचे मिलन होऊन जमिनीत अंडी देतात. अंडयातून निघालेल्या अळया पिकाना नुकसान पोहचवितात. त्यामुळे सध्या जमिनीतुन निघालेल्या हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन अंडी घालण्या अगोदरच झाल्यामुळे अंळी पासून पिकांना होणारे नुकसान टाळता येते, त्‍या करिता पुढील उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे.  
प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन
-    झाडाच्या फांदया हालवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा. चांगला पाऊस पडताच सुर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुलिंब इत्यादी झाडावर पाने खाण्यासाठी मिलनासाठी जमा होतात. झाडावर जमा झालेली भुंगेरे रात्री 8 ते 9 वाजता बांबुच्या काठीच्या साहाय्याने झाडाच्या फांदया हालवून खाली पाडावेत आणि ते हाताने गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे. तसेच जो पर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.
-    प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करुन देखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहीरीजवळ किंवा झाडावर लावावेत. सापळया जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारपणे संध्याकाळी 7.30 ते 8.30 या कालावधीत लावावेत.
-    किटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळ, कडुनिंब यांच्या फांदया शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावी. रात्रीला भुंगेरे फांदयावरील पाने खाल्यामुळे रुन जातील.
-    जमिनीतून प्रौढ भुंगेरे निघण्याच्या कालावधीत बाभूळ, कडुनिंब इत्यादी झाडावर सरासरी 20 अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास किंवा झाडांची पाने खाल्लेली आढळल्यास कोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मि.ली. प्रती दहा लिटर पाण्‍यात मिसळून झाडावर फवारणी करावी. फवारणीनंतर 15 दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ देऊ नयेत.
अळीचे व्यवस्थापन
-    ज्या क्षेत्रामध्ये मागील 2 वर्षापासून हुमणीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, अशा क्षेत्रात पेरणी करतांना जमिनीतुन जैविक परोपजिवी बुरशी मेटारायझियम ॲनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा प्रति हेक्टर 10 किलो या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. किंवा फोरेट 10 टक्के दाणेदार किंवा फिप्रोनिल 0.3 टक्के दाणेदार 25 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात दयावे

वरिल प्रमाणे शेतकऱ्यांनी हुमणीच्या प्रौढ भुंगेरे व अळयांचे सामूहीकरित्या व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन कृषि किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व क्रॉपसॅप प्रकल्पाचे डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. अनंत बडगुजरडॉ. कृष्णा अंभुरे यांनी केले आहे.