Wednesday, July 18, 2018

मराठवाडयात महिलांच्‍या सहभागाने रेशीम क्रांती शक्‍य.......कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण

वनामकृवित रेशीम उदयोगावर एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण संपन्‍न
कुटुबांतील किंवा शेतीतील कोणतेही काम ग्रामीण भागातील महिला या काटेकोरपणे व शास्‍त्रशुध्‍द पध्‍दतीने करतात, म्‍हणून महिलांनी जर पुरुषांच्‍या बरोबरीने रेशीम शेतीत सहभाग घेतला तर निश्‍चीतच मराठवाडयात रेशीम क्रांती होवू शकते, असे प्रतिपादन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र येथे रेशीम संशोधन योजना व परभणी आत्‍मा यांचे संयुक्‍त विदयमाने ‘‘शेतीवर आधारीत तुती रेशीम उदयोग’’ या विषयावर दिनांक १७ जुलै रोजी आयोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, परभणी आत्‍माचे प्रकल्‍प संचालक श्री. के. आर. सराफ, रेशीम संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सी.बी. लटपटे, विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, केंद्रीय रेशीम बोर्डाचे श्री. करंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  
कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले कि, अल्‍प व अत्‍यल्‍प भुधारणा, कोरडवाहू शेती, निसर्गाचा असमतोल, शेतमालाचे बाजारभाव आदी मराठवाडयातील शेतक-यांचे अनेक प्रश्‍न आहेत. गाव पातळीवर शेतमाल प्रक्रिया उदयोगाचा विकास करणे गरजेचे आहे. शेती किफायतशीर करण्‍याच्‍या दृष्‍टीने शेती पुरक उद्योगाची जोड द्यावी लागेल. रेशीम उदयोगातील तांत्रिक बाबी समजून घेतल्‍या तर निश्‍चीतच शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट होईल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी तरुण शेतक-यांना रेशीम शेतीची कासधरा व आपली उन्‍नती करा असे आवाहन करूण म्‍हणाले की, मराठवाडा तुती लागवडीचे प्रमाण वाढत असुन मराठवाडा रेशीम शेतीचे हब होऊ शकते. कोष उत्‍पादनाबरोबर धागा निर्मीती व कापड निर्मीतीची सोय निर्माण झाली तर मराठवाडयाची पैठणी पुन्‍हा नावारुपाला येईल. शेतक-यांनी गटाच्‍या माध्‍यमातून रेशीम धागा व कापड निर्मीती करावी, जेणेकरुन बाजारभावातील चढ-उतार यावर मात करता येईल.
प्रशिक्षणात डॉ. सी. बी. लटपटे यांनी तुती लागवडीमधील बारकावे तंत्रशुध्‍द पध्‍दतीने समजून सांगितले तर आत्‍मा प्रकल्‍प संचालक श्री. के. आर. सराफ यांनी शेंदरी बोंड अळीचे संकट कमी करण्‍यासाठी शेतक-यांनी रेशीम शेतीकडे वळण्‍याचे आवाहन करून परभणी जिल्‍हाधिकारी यांचे मान्‍यतेने प्रशिक्षणासाठी निधी उपलब्‍ध करुन दिल्‍याचे नमुद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. जे. एन. चौंडेकर यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.