Friday, July 6, 2018

लातुर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालायांत जैवमाहिती तंत्रज्ञानावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

लातुर: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालायांतर्गत दिनांक ४ व ५ जुलै जैवमाहीती तंत्रज्ञानावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग पुरस्कृत योजने अंतर्गत ह्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय व कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातुर येथील पदव्युत्तर विद्यार्थ्यासाठी जैवमाहीती तंत्रज्ञानासंबधी कौशल्यविकास करिता करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत पाटील यांनी विद्यार्थांना या नवीनतम कृषि जैव-माहिती विज्ञान क्षेत्रामध्ये विद्यार्थांनी करीअर म्हणून पहिले पाहण्‍याचा सल्‍ला दिला तर लातुर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण कदम यांनी या जैवमाहिती तंत्राचा वापर होऊन भविष्यात शेतकऱ्यांच्या पिकांची गुंणवत्ता व उत्पादकता वृद्धींगत होऊ शकेल, असा मत व्यक्त केला.
सदर प्रशिक्षणांतर्गत जैवमाहिती तंत्रज्ञान संबधी विविध साधने व तंत्र याबाबत अरेजेन टेकनॉलोजी कंपनीतील तज्ञ राजेश कुमार महतो यांनी मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविकात कार्यशाळेचे आयोजक डॉ. अमोल देठे यांनी जनुक शोध, संगणक पॅटर्न ओळख, डेटा खाण, मशीन शिक्षण, अल्गोरिदम विकास आणि जीनोमिक्स संबंधित प्रणालीचे महत्व विषद केले. प्रशिक्षण यशस्‍वीतेसाठी डॉ. राहुल चव्हाण, प्रा. मकरंद भोगावकर आदींनी सहकार्य केले.
जैवमाहिती तंत्रज्ञान (बायोइन्फॉर्मेटिक्स) हि उदयोन्मुख माहिती तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान यांचा संयोग असलेली जीवशास्त्राचीच एक शाखा आहे. याद्वारे, वनस्पती वा इतर सजीवांच्या जनुकांमध्ये कोणतेही बदल टिपण्यासाठी, रोगप्रतिकारक व जबाबदार जनुकीय गट शोधण्यासाठी, नवनवीन औषधाच्या निर्मितीत मदत करण्यासाठी हे अत्यंत अचूकपणे तसेच अल्पकालावधीत सध्या केले जाऊ शकते हे विशेष. याचेच उदाहरण म्हणजे मानवीय जनुकीय नकाशाची निर्मिती, अश्याच प्रकारे अनेक पिके व शेतीउपयोगी जिवानुंचा देखील जनुकीय संरचनेचा अभ्यास व त्यावरील संशोधन आता अधिक सक्षमपणे करणे, शक्य झाले आहे. यातून मोठ्या प्रमाणात दडलेली जैवकिय माहिती व तिचा योग्य वापर एकूणच मानवकल्यानाकरिता होणे अपेक्षित आहे.