Sunday, July 1, 2018

महाराष्ट्र राज्यातील कृषी विकासाची पायाभरणी कै. वसंतराव नाईक यांच्याच काळात....कुलगूरू मा. डॉ. अशोक ढवण

कृषि दिनानिमित्‍त वनामकृवितील कृषि महाविद्यालयात आयोजीत व्‍याख्‍यानात प्रतिपादन
माननीय वसंतराव नाईक महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री असतांना 1972 सालच्‍या भीषण दुष्‍काळात खेडयातील अनेक कुटूंबात दोन - दोन दिवस चुल बंद असत, हे पाहुन राज्‍यात पुन्‍हा असा प्रसंग येऊ नये, राज्‍यातील भुक मुक्‍तीसाठी दुरूदृष्‍टी ठेऊन कृ‍षी विकासाचे नियोजन केले, राज्‍यात विविध कृषी विकास योजनांची पायाभरणी त्‍यांनीच केली. पुढे राज्‍याच्‍या कृषी विकासाच मोठी चालना मिळाली म्‍हणुनच त्‍यांना आपण हरितक्रांतीचे प्रणेते असे संबोधीतो, असे प्रतिपादन कुलगूरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने कै. वसंतराव नाईक यांच्‍या जयंती निमित्‍त कृषि दिनाचे औजित्‍य साधुन दिनांक 1 जुलै रोजी आयोजित हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक – जीवन कार्य व कृषि क्षेत्रातील योगदान या विषयावर व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ. एन. जी. लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, माननीय वसंतराव नाईक यांनी सतत अकरा वर्ष यशस्‍वीपणे मुख्‍यमंत्रीपद भुषविले. त्‍यांचे शेती व शेतक-यांवर नितांत प्रेम होते, आधुनिक शेतीची संकल्‍पना रूजविण्‍यासाठी त्‍यांच्‍याच काळात राज्‍यातील चार स्‍वतंत्र विभागासाठी चार कृषी विद्यापीठाची स्‍थापना करण्‍यात आली. कसेल त्‍याची जमिन यासाठी क्रांतीकारी असा कुळ कायदा पारित झाला. मजुरांना रोजगार पुरविण्‍यासाठी रोजगार हमी योजना कायदाही त्‍यांच्‍याच काळात लागु करण्‍यात आला. राज्‍यातील शेतीसाठी आवश्‍यक सिंचनाच्‍या व वीजेच्‍या सोयीसाठी अनेक प्रकल्‍पांची पायाभरणी करण्‍यात आली. ते विरोधकांनाही आपलेस करणारे व्‍यक्‍तीमत्‍व होते. आजही राज्‍यातील कृ‍षी क्षेत्रापुढील अनेक आव्‍हाने असुन कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कृषि तंत्रज्ञाननिर्मिती करून तंत्रज्ञानात्‍मक बाबींचा विकास करावा तर धोरणकर्त्‍यांनी शेतीशी निगडीत धोरणात्‍मक बाबींचा आग्रह धरल्‍यास निश्चितच आपण सर्वांच्‍या सहकार्यातुन शासनाने निश्चित केलेले शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे उदिदष्‍टे साध्य करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाषणात मा. डॉ. अशोक ढवण यांनी सन 1974 साली माननीय वसंतराव नाईक यांच्‍या परभणी कृ‍षी विद्यापीठ भेटीप्रसंगी त्‍यांना जवळुन पाहण्‍याचा योग आल्‍याचे सांगुन त्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाबाबतच्‍या अनेक पैलूंचा उलगडा त्‍यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले तर आभार डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.