Thursday, September 24, 2020

सेंद्रीय उत्पादनास योग्य बाजारभाव मिळवण्यासाठी प्रमाणीकरण आवश्‍यक...........डॉ. अे. के. यादव

वनामकृवित आयोजित राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेत प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रपशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प आणि मुंबई येथील फार्म दु फोर्क सोल्‍युशन्‍य यांचे संयुक्‍त विद्यमाने सेंद्रीय शेती यावर पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेच्‍या माध्‍यमातुन आयोजन दिनांक २१ सप्‍टेबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाच्‍या दुस-या दिवशी दि. २१ सप्‍टेबर रोजी सेंद्रीय शेती विषयक विविध योजनाबाबत भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयातील सल्लागार डॉ. अे. के. यादव व पुणे येथील कृषि आयुक्तालयातील सेंद्रीय शेती राज्य समन्वयक श्री. सुनिल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर श्री. कराड येथील प्रगतशील शेतकरी श्री अनिल कुलकर्णी हे सहअध्यक्ष होते.

डॉ. अे. के. यादव यांनी भारत सरकारच्‍या सेंद्रीय शेतीच्‍या विविध योजनाबाबत माहिती देतांना म्‍हणाले की, भारतातील प्रादेशिक विविधता लक्षात घेता विविध प्रकारच्या सेंद्रीय उत्पादनास व निर्यातीस मोठा वाव आहे. सेंद्रीय शेतमालास योग्‍य बाजारभाव मिळवण्‍यासाठी प्रमाणीकरण फार गरजेचे असल्‍याचे सांगुन सेंद्रीय शेतमाल प्रमाणीकरणाबाबत सविस्‍तर माहिती दिली. तर श्री. सुनिल चौधरी यांनी सेंद्रीय शेतीसाठी राज्य शासनाच्या योजनांची माहिती देऊन शेतकरी बांधवानी गट प्रमाणीकरणावर करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला­ प्रगतशील शेतकरी श्री. अनिल कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

अध्‍यक्षीय भाषणात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीत काम करतांना शेतक-यांचे अनुभव अतिशय महत्वाचा असुन विद्यापीठात होत असलेल्या संशोधनात शेतक-यांचा सहभाग असणे गरजेचे आहे. सेंद्रीय शेती करतांना पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान विकसीत करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. गट माध्‍यमातुन शेतक-यांनी सेंद्रीय शेती व सेंद्रीय प्रमाणीकरण करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मुख्‍य आयोजन डॉ आनंद गोरे यांनी केले तर सुत्रसंचालन श्री. उमेश कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ स्मिता सोलुंकी, डॉ. रणजित चव्हाण, डॉ. कैलास गाढे आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ऑनलाईन प्रशिक्षणात शेतकरी बंधुभगिनी, शेतकरी युवक, युवती, विद्यार्थी, कृषि उद्योजक मोठया संख्येने सहभागी झाले होते.