Tuesday, March 16, 2021

सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी ….. मा. कुलगुरु डॉ. अशोक ढवण

ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

सेंद्रीय शेतमालास बाजारात मोठया प्रमाणात मागणी आहे. सेंद्रीय शेती संशोधनाबरोबरच उपलब्ध तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. आवश्यक सेंद्रीय निविष्ठा शेतावरच तयार करणे, विविध तंत्रज्ञान पध्दतींचा शेतक-यांच्या शेतावर वापर, सेंद्रीय प्रक्रिया उद्योग यातून ग्रामीण युवकांना रोजगा-या मोठया संधी आहेत, यातुन ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्‍यासही मदत होईल, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेले परभणी येथील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि हैदराबाद येथील शाश्वत शेती केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १५ मार्च ते २१ मार्च दरम्‍यान सात दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी गाझीयाबाद येथील राष्ट्रीय जैविक शेती केंद्राचे संचालक डॉ. गगनेश शर्मा हे उपस्थित होते तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, जबलपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. ए.एस. राजपूत, गंगटोक (सिक्किम) येथील राष्ट्रीय सेंद्रीय शेती संशोधन संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. रवि कांत अवस्थी, पुणे येथील कृषि आयुक्तालयातील उपसंचालक श्री. अशोक बाणखेले, आयोजक डॉ. वाचस्पती पांडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. रामानजानेयूलू, डॉ. रणजित चव्हाण आदी उपस्थित होते.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, देशात विविध भागात सेंद्रीय शेती पध्‍दतीत मोठया प्रमाणात विविधता आढळते. सेंद्रीय शेती संशोधनाच्‍या दृष्‍टीने आंतरशाखीय दृष्टीकोन समोर ठेवून काम करणे गरजेचे असुन सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी समन्वय महत्वाचा आहे. सेंद्रीय शेतीबाबतच्‍या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांचे प्रत्‍यक्ष अनुभव महत्वाचे आहेत.

मार्गदर्शनात डॉ. ए. एस. राजपूत म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीत आशिया खंडात भारत आघाडीवर आहे, येत्या काळात सेंद्रीय शेतीसाठी मोठी संधी असुन ग्रामीण विशेष करुन आदिवासी बहूल क्षेत्रात सेंद्रीय शेतीसाठी मोठा वाव आहे. सेंद्रीय उत्पादनासाठी बाजारपेठ तंत्र विकसीत करणे, त्यासाठी विविध पर्याय शोधणे आवश्यक आहे. ओडीसा राज्यात आदिवासी बहूल क्षेत्रात सेंद्रीय शेती ज्याप्रमाणे वाढत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मोठी संधी असल्‍याचे ते म्‍हणाले तर डॉ. आर. के. अवस्थी आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, भारत अन्नधान्याची निर्यात करत असुन अन्नधान्यात संपन्नता असल्याने आज सेंद्रीय शेतीत विविध प्रयोग करण्‍याची संधी आहे. विषमुक्त अन्न उत्पादन, कमीत कमी संसाधनांचा वापर, पर्यावरणाचा समतोल राखून केली जाणारी सेंद्रीय शेती एक चांगली शेती पध्दती पुढे आली आहे. सेंद्रीय शेतीत पारंपारिक ज्ञाना सोबतच विज्ञानाची भुमिका महत्वाची आहे.

मार्गदर्शनात श्री. अशोक बाणखेले म्‍हणाले की, महाराष्ट्रात ७.५ लाख हेक्टर क्षेत्र असून राज्यात पीजीएस प्रमाणीकरणाखाली ३७००० हेक्टर तर ३.५ लाख हेक्टर तृतीय पक्षी प्रमाणीकरण झालेले आहे. राज्यात व केंद्र शासनाच्या सेंद्रीय शेतीच्या विविध योजनांचा शेतकरी बंधु भगिनी यांनी लाभ घ्यावा. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून शेतकरी गट व सेंद्रीय शेतीचे क्लस्टर तयार करून केवळ उत्पादन नाही तर बाजारपेठ व्यवस्थापनावर देखील भर देण्यात आला आहे.

गोंदीया येथील रुची बायो टेक आणि फार्म्सचे डॉ. महेंद्र ठाकूर यावेळी बोलतांना सांगितले की, शेतकरी बांधवाना स्वत:ची व संपूर्ण गावाची प्रगती करण्‍याचे सामर्थ्य सेंद्रीय शेती पध्दतीमध्ये आहे. यातून पदवीधर युवक, युवती यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. डॉ. जी. व्ही. रामनजानेयुलू यांनी सेंद्रीय शेती ही एक व्यापक संकल्पना असून सामान्य शेतकरी यामध्ये जोडणे व त्याला पाठबळ देणे गरजेचे आहे असे सांगीतले. 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ. वाचस्पती पांडे यांनी नागपुर येथील क्षेत्रीय सेंद्रीय केंद्राच्‍या सेंद्रीय शेतीच्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर वनामकृवितील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी प्रशिक्षण आयोजना मागील भुमिका स्पष्ट केली. तांत्रिक सत्रात डॉ. आनंद गोरे यांचे सेंद्रीय शेतीमध्ये पीक व्यवस्थापन तर दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातीलविभाग प्रमुख डॉ. पी. एस. बोडके यांनी हवामान बदलानुरुप सेंद्रीय शेती या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. रणजित चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. आनंद गोरे  यांनी मानले. ग्रामीण भागातील युवक, युवती, पदवीधर युवक, युवती, प्रगतशील शेतीकरी यांच्यासाठी सदरिल सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण, संचालक डॉ. गगनेश शर्मा व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असुन प्रशिक्षणास शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. चंद्रकला, कु. व्हिन्यासा, श्री. अभिजीत कदम, डॉ. सुनिल जावळे, श्री. श्रीधर पतंगे, श्री. सतिश कटारे, श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.