Saturday, March 20, 2021

वनामकृवित तेलबिया उत्‍पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत करडई संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने राष्‍ट्रीय तेलबिया उत्‍पादन अभियानांतर्गत दिनांक १९ मार्च रोजी तेलबिया उत्‍पादन तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाबीजचे विभागीय व्‍यवस्‍थापक श्रीअरूण सोनोने हे उपस्थित होते.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयात तेलबीया पिक लागवडीखालील क्षेत्र व उत्‍पादकता वाढीस मोठा वाव आहे. तेलबीया पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान तसेच काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवामध्‍ये प्रसाराकरिता कृषि विज्ञान केंद्रे व विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता विशेष प्रयत्‍न करावेत. 

संशोधन संचालक डॉ वासकर यांनी विद्यापीठ विकसित तेलबीया पिकांचे वाण, त्‍यासाठीचे यांत्रिकीकरण, करडई व कारळ पिकांचे औषधी मुल्‍य व बाजार व्‍यवस्‍था याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करडई व कारळ लागवड तंत्रज्ञान या पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले. तांत्रिक सत्रात डॉ एस बी घुगे, प्रा प्रितम भुतडा, डॉ संतोष पवार, डॉ जाधव यांनी करडई व कारळ पिकांचे वाण, लागवड तंत्रज्ञान,  किड रोग व्‍यवस्‍थापन याबाबत मार्गदर्शन केले. करडई संशोधन प्रकल्‍पाचे प्रभारी अधिकारी डॉ एस बी घुगे यांनी प्रास्‍ताविक केले तर सुत्रसंचालन प्रा प्रा प्रितम भुतडा यांनी केले. प्रशिक्षणास मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्रे व विद्यापीठांतर्गत विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता, महाबीज क्षेत्र अधिकारी, प्रगतशील शेतकरी प्रशिक्षणास उपस्थित होते.