शेतकरी महिलांनी
शेतमाल प्रक्रिया व मुल्यवर्धनाचे कौशल्य अवगत करून प्रक्रिया उद्योग सुरू
करावेत ..... शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालयातील अन्न प्रक्रिया विभागाच्या वतीने भारतीय कृषि
अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अनुदानीत कौशल्य विकास योजने अंतर्गत अनुसुचित जाती प्रवर्गातील महिला
लाभार्थीसाठी दिनांक 22 मार्च ते 27 मार्च दरम्यान काढणीपश्चात तंत्रज्ञान व अन्न प्रक्रिया यावर सहा दिवसीय प्रशिक्षण
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन प्रशिक्षणाचे उद्घाटन 22 मार्च रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले होते तर आयोजक प्राचार्य डॉ. उदय
खोडके,
महिला आर्थिक विकास
महामंडळाच्या परभणी जिल्हा समन्वयक श्रीमती निता अंभोरे, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. विजया पवार, डॉ.सुरेंद्र
सदावर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले म्हणाले की, पिक काढणी वेळेस बाजारातील आवक वाढल्यामुळे कमी किमतीत शेतकरी बांधवाना कच्च्या मालाची विक्री करावी लागते. शेतमालावर प्रक्रिया व मुल्यवर्धन केल्यास निश्चितच आर्थिक लाभ जास्त होऊन उन्नती साधता येते. शेतकामात महिलांचा प्रमुख वाटा असुन त्यांच्यात उपजतच कौशल्यामुळे पीक लागवड ते काढणीपर्यंत सर्व काम चांगल्या प्रकारे केले जाते. शेतमाल प्रक्रिया व मुल्यवर्धनाचे कौशल्य शेतकरी महिलांनी अवगत करून शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, असा सल्ला त्यांनी दिला.
मार्गदर्शनात श्रीमती
निता अंभोरे म्हणाल्या की, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये महिला सक्षम होत असुन अन्न
प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा कच्चामाल, मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे घरगुती आधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर करुन अन्न
प्रक्रिया गृहउद्योग सुरु करता येतील व त्यांच्या निर्यातीसाठी संधी उपलब्ध होतील.
प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राज्यस्तरावरील अन्न प्रक्रिया व नियोजन या योजने बाबत माहिती दिली. तसेच जागतिक जल दिनानिमीत्त्त अन्नाबरोबर पाण्याचे महत्व नमुद केले. तसेच डॉ. विजया पवार यांनी सहा दिवसीय प्रशिक्षणाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपाली गजमल यांनी केले व आभार डॉ. सुरेंद्र सदावर्ते यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. राजेश क्षिरसागर, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. दिलीप मोरे, डॉ. कैलास गाढे आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी ग्रामीण भागातील निवडक 30 अनुसुचित जातीच्या महिलांनी सहभाग नोंदविला आहे. प्रशिक्षणार्थीसाठी कोव्हिड-19 च्या नियमांचे पालन करत सर्व आवश्यक सामग्रीच्या किटचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.