Saturday, March 27, 2021

वनामकृवि तर्फे दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि विद्या विभागाद्वारे व राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) सहकार्याने मागासवर्गीय पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विषयज्ञान विकासासाठी “दोन दिवसीय ऑनलाईन मार्गदर्शन प्रशिक्षण वर्गाचे दिनांक २६ ते २७ मार्च दरम्यान आयोजित करण्‍यात आले असुन दिनांक २६ मार्च रोजी मार्गदर्शन वर्गाचे उदघाटन गुंटुर (आंध्रप्रदेश) येथील आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रतापकुमार रेडडी, वनामकृविचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एस. जाधव यांच्‍या प्रमुख उपस्थित झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर हे उपस्थित होते. 

मार्गदर्शनात प्रमुख पाहुणे डॉ. प्रतापकुमार रेड्डी यांनी राष्‍ट्रीय पातळीवरील कृषि संशोधनाशी संबंधीत स्पर्धा परीक्षासाठी तयारी करतांना कशा प्रकारे नियोजन करावे याबाबत मार्गदर्शन केले. स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना निश्चित ध्‍येय ठेवुन तयारी करावी. योग्‍यरित्‍या नियोजन करून तयारी केल्‍यास निश्चितच यश प्राप्‍त होते असे ते म्‍हणाले. तर डॉ. जी. एस. जाधव यांनी सदरिल मार्गदर्शन वर्गाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. डी. पी. वासकर म्‍हणाले की, स्‍पर्ध परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांकरता वेळोवेळी प्रश्नमंजुषा, चर्चासत्रे, अभ्यासवर्ग आदींचे आयोजन करावे. नावाजलेल्या संस्‍थेस व विद्यापीठांना भेटी देवून माहिती जाणून घ्यावी असे आवाहन करून मार्गदर्शन वर्ग आयोजीत केल्याबद्दल आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्‍ताविकात कृषिविद्या विभाग विभाग प्रमुख तथा आयोजक डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. मिर्झा आय.ए.बी तर आभार प्रा. ज्योती गायकवाड यांनी म्‍हणाले. सदरिल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कुलगुरु मा डॉ अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्‍या मार्गदर्शनानुसार करण्‍यात आले असुन दोन दिवसीय प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना कनिष्‍ठ संशोधन फेलो, वरिष्‍ठ संशोधन फेलो, राष्‍ट्रीय पात्रता परिक्षा, कृषि संशोधन सहाय्यक आदी राष्‍ट्रीय पातळीवरील कृषिच्‍या स्पर्धापरीक्षाबाबत राष्ट्रीय पातळीवरील नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन करणार आहेत. यात विद्यापीठातील डॉ. मिर्झा आय. ए. बी., तिरुपाथुर (तामीळनाडू) येथील फिनीक्स कोचिंग सेंटरचे डॉ. एम. जगदीश, जोधपुर (राजस्थान) येथील कृषी संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. मुला राम, कानपुर येथील कृषी विद्याचे शास्‍त्रज्ञ डॉ. कांनचेती मृनालीनी आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.