Thursday, March 18, 2021

अधिक आर्थिक फायद्यासाठी पीक पध्दतीमध्ये बदल करणे आवश्यक ....... डॉ. दत्‍तप्रसाद वासकर

वनामकृविच्‍या वतीने मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे शेतकरी मेळावा संपन्‍न  

शेतकऱ्यांच्या शेतमालाचे उत्पादन आर्थिक उत्पन्न वाढीच्या दृष्टीने विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पीक पध्दती, पिकाचे वाण, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे असुन पीक पध्दतीमध्ये बदल करावा लागेल, असे प्रतिपादन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प अंतर्गत असलेल्‍या कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती योजनाहैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था यांचे संयुक्‍त विद्यममाने दिनांक १६ मार्च रोजी मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते,  मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे हे उपस्थित होते तर मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, पालम तालुका कृषि अधिकारी श्री. आबासाहेब देशमुख, निवृत्त कृषि उपसंचालक श्री. पांडुरंग ब्याळे, उपसरपंच श्री रमाकांत पौडशेटे, मंडळ कृषि अधिकारी श्रीमती आश्विनी वणवे, मंडळ कृषि अधिकारी श्रीमती सविता गलांडे, कृषि सहाय्यक श्री. दादाराव आनंदराव, श्री. बाबुमियाँ शेख, रिलायन्स फाऊंडेशन प्रतिनिधी श्री प्रकाश साळुंके, मुख्याध्यापक श्री. त्र्यंबक ब्याळे आदींची उपस्थिती होती. 

मार्गदर्शनात डॉ. वासकर पुढे म्‍हणाले की, कोरडवाहू भागात पाण्‍यास मोठे महत्‍व आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने विहीर तसेच कुपनलिका पुनर्भरण करणे गरजेचे असुन पावसाचे पाणी साठवण करण्यासाठी शेततळ्याचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्याने करावा. कोरडवाहू परिस्थितीत बाजरा आणि जवस ही चांगले उत्‍पन्‍न देऊ शकते, याकरिता यापासुन मूल्यवर्धक पदार्थाची निर्मिती बाजारात विक्री करावी लागेल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

भाषणात श्री. संतोष आळसे यांनी शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांबाबत मार्गदर्शन केले. विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी बाजारातील गरजेनूसार शेतीतील पीक पध्दतीमध्ये बदल करावा त्यातून नफा मिळवावा, असे आवाहन केले. श्री. पांडुरंग ब्याळे यांनी पाण्याची कमतरता, पावसाचा खंडकाळ, मजुरांची कमतरता आदीवर मार्गदर्शन केले तर श्री आबासाहेब देशमुख यांनी शासनाच्या शेतीविषयक विविध योजनांची माहिती दिली.

मेळाव्याचे तांत्रिक सत्रात आयोजक मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांनी पीक पीक पध्दती, एकात्मिक शेती पध्दतीमध्ये फळपीके, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कूटपालन चारा व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले तर कृषि अभियंता डॉ. मदन पेंडके यांनी विहीर कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान, रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पध्दती यावर मार्गदर्शन केले.

हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे २०१८-१९ पासूनकोरडवाहू एकात्मिक शेती पद्धतीही योजना राबविण्यात येत असुन योजनेअंतर्गत गावातील २८ शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे, यात २० कोरडवाहू   अल्पओलीताखालील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या निवडीक शेतकऱ्यांना खरीप रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध पिकांचे विद्यापीठ विकसित वाणाचे बियाणे तसेच शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जनावरांचे दुग्ध उत्पादनवाढीसाठी खनिज मिश्रणाचेही वाटप करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत शेतीशी जोडधंदे शेळीपालन कुक्कुटपालन यासंबंधीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. यात एक हेक्टर क्षेत्रामध्ये एकात्मिक शेती पध्दतीचा वापर करुन शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या उत्पादनात आर्थिक उत्पन्नात वाढीच्या दृष्टीने कार्य सुरु आहेकार्यक्रमास आडगाव येथील शेतकरी गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सारिका नारळे यांनी केले तर आभार श्रीमती आम्रपाली गुंजकर यांनी म्‍हणाले. मेळाव्याच्या आयोजनासाठी श्री. मल्लिकार्जुन ब्याळे, श्री. मोरेश्वर राठोड, श्री. सुमित सुर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.