Wednesday, March 24, 2021

मराठवाडयात कृषी प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी ...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवितील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित शेतमाल प्रक्रिया लघुउद्योग प्रशिक्षणाचे उदघाटन

देशांतर्गत शेतमाल प्रक्रिया आणि मुल्यवर्धनाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात अत्‍यंत कमी असुन कृषी माल प्रक्रियेच्या अभावी अन्‍नधान्ये, भाजीपाला व फळे यांची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. शेतमालेचे नुकसान टाळण्यासाठी छोटे छोटे कृषी उद्योग सुरु होणे आवश्यक आहे. मराठवाडयात कृषी प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मत कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग यांचे तर्फे भारतीय कृषी अनुसंधान परिषद अनुदानित कौशल्य विकास योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थीकरिता “शेतमाल प्रक्रिया लघु उद्योग” याविषयावर दिनांक २३ ते २६ मार्च दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात असुन दि. २३ मार्च रोजी प्रशिक्षणाचे उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, मुख्‍य आयोजक सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्‍या भाषणात शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले म्हणाले कि, अन्नधान्य, डाळ आणि अन्य शेतमाल यांचे प्रक्रिया करून आवश्यक पाकेजिंग केल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिक आर्थिक मोबदला मिळतो. तर संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर मार्गदर्शनात म्‍हणाले की, आहारातील चिंच, अद्रक, लसून यावर प्रक्रिया करून त्यावर आधारित छोटे छोटे उद्योग सुरु करण्यास मराठवाडयात खूप वाव असल्याचे नमूद केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, कृषी प्रक्रिया उद्योग याचा देशाच्या विकासातील सहभाग वाढत असून सध्या देशात २५ लाख असंघटीत प्रक्रिया उद्योग आहेत ज्यामुळे अनेकांना रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होत आहे.

प्रास्ताविक कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख व आयोजक डॉ. स्मिता खोडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. मधुकर मोरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रमोदिनी मोरे यांनी केले. सदरिल प्रशिक्षणात लघुउद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध विषयावर जसे विविध शासकीय योजना, अर्थ सहाय्यासाठी बँक व इतर संस्थांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे यासह सोयबिन प्रक्रिया उद्याग, हळद व अद्रक प्रक्रिया, फळे व भाजीपाला प्रक्रिया, जवसापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे इ. माहिती व प्रात्यक्षिके घेण्यात घेणार असल्याचे सांगितले.याशिवाय विविध शेतमाल प्रक्रिया यंत्रे व सामुग्री, वेष्ठ्नीकरण, ब्रान्डईंग व विपणन यावर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणात ३० पेक्षा जास्त पुरुष आणि महिलांचा अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी सहभाग नोंदविलेला आहे. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.