Thursday, June 15, 2023

हवामान बदलानुरूप तंत्रज्ञानाचा वापर करुन कोरडवाहू शेतीत उत्पादकता वाढी शक्‍य …… कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वनामकृवित आयोजित खरीप हंगाम नियोजन व शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

कोरडवाहू शेती ही पर्जन्य आधारीत असुन माती व पाणी या नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे. कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनात वाढ करणे शक्य आहे. कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती, विद्यापीठाने विकसीत वाण आणि कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विकसीत केलेले विहीर व कुपनलिका पुनर्रभरण तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असा सल्‍ला कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी दिला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पाच्या वतीने खरीप हंगाम नियोजन व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक १५ जुन रोजी करण्यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोतल होते. यावेळी प्रमुख पाहुणे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री प्रविण देशमुख, सरपंच (बाभुळगाव) श्री. रामदास दळवे, सरपंच (उजळंबा) श्री. विठ्ठल धोतरे, सरपंच (सोन्ना) श्री. मारोती कदम, सरपंच (आडगांव) श्री. बालासाहेब ढोले आदींची विशेष उपस्थिती होती. कोरडवाहू शेती संशोधन केंद्रामार्फत हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रम परभणी तालुक्यातील बाभुळगाव, उजळंबा आणि सोन्ना या गावात शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येतो. तसेच कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती प्रकल्प आडगांव ता. पालम, जि. परभणी येथील शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येतो. या प्रकल्‍पा अंतर्गत सदर मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते.

मार्गदर्शनात संचालक संशोधन डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विकसीत तंत्रज्ञानाचा वापर करावा. विद्यापीठ विकसिकोरडवाहु शेतीस अनूकुल विविध पिकांच्‍या वाणांचा वापर करण्याचे आवाहन करून कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सहभाग चांगल्‍या मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मा श्री. प्रविण देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांनी आंतरपीक पध्दती एकात्मिक शेती पध्दती, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, आपतकालीन पीक नियोजन, मुलस्थानी जलसंधारण याबद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात तसेच प्रात्याक्षिकांसाठी निवडक शेतकरी बांधवांना विद्यापीठ विकसित बियाणे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात डॉ. मदन पेंडके यांनी उपक्रमात केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. सुत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार श्रीमती आम्रपाली गुजंकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश राऊत, शिवाजी काळे, विलास रिठे, मोरेश्वर राठोड, सुमीत सुर्यवंशी आदींनी परीश्रम घेतले.