वनामकृविच्या कौशल्य विकास – कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ
औरंगाबाद : शेतीच्या विकासासाठी
यांत्रिकीकरणाचा वापर प्रभावीपणे करणे आवश्यक असून शेतक-यांमध्ये कौशल्य विकास
करणे आवश्यक असल्याचे मत कुलगुरु मा डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि सी.एन.एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू
हॉलंड), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ मे रोजी आयोजित “कौशल्य विकास-कृषी
यांत्रिकीकरण प्रशिक्षण” कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ पैठण रोडवरील कृषी विज्ञान
केंद्रात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी ऑनलाइन माध्यमाव्दारे अटारी पुणेचे संचालक डॉ. एस.के. रॉय, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना, संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, सीएसआर, सीएनएच नवी दिल्लीच्या प्रमुख कविता साह, सीएसआर, सीएनएचचे पश्चिम प्रक्षेत्र प्रमुख नितीन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, डॉ. उदय खोडके, डॉ. सुर्यकांत पवार, डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. किशोर झाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठ, परभणी आणि सी.एन.एच.
इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू हॉलंड), नवी दिल्ली यांच्यात करार होऊन “उन्नत
कौशल्य – कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण” कार्यक्रम मराठवाडा विभागात राबवला जाणार
आहे. ज्यामध्ये विद्यापीठ अंतर्गत
कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी, कृषी विज्ञान केंद्र,
औरंगाबाद, खामगाव, बदनापूर, तुळजापूर यांच्यामार्फत एक वर्षामध्ये प्रत्येकी ६ तीन
दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. ज्याव्दारे दिड हजार पेक्षा जास्त शेतक-यांना कृषी यांत्रिकीकरणावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी अटारी पुणेचे संचालक डॉ. एस.के. रॉय यांनीही ऑनलाईन मार्गदर्शन केले. डॉ. देवसरकर, श्री देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. श्रीमती साह यांनी सी.एन.एच. इंडस्ट्रीय इंडिया (न्यु हॉलंड) मार्फत करण्यात आलेल्या विविध कार्य व उपक्रमांची माहिती दिली. श्री. सावंत यांनीही कंपनीच्या विविध उपक्रमाच्या माहितीचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. किशोर झाडे यांनी केले.