Sunday, June 11, 2023

राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीकरिता माननीय राज्‍यपाल यांनी घेतली कुलगुरूंची बैठक

अकोला : महाराष्‍ट्राचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा श्री रमेश बैस यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक १० जुन रोजी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत नऊ अकृषी व दोन कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुं समवेत बैठक संपन्‍न झाली. बैठकीस कृषीमंत्री मा ना श्री अब्दुल सत्तार, राज्यपालांचे प्रधान सचिव मा श्री संतोष कुमार, उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव मा श्री विकासचंद्र रस्तोगी, कृषी विभागाचे प्रधान सचिव मा श्री एकनाथ डवले, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव मा श्री जे. पी. गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय राज्‍यपाल श्री रमेश बैस म्‍हणाले की, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक असुन याबाबत आवश्यक तयारी व भरीव अंमलबजावणी करून राज्‍यातील विद्यापीठांनी देशापुढे उदाहरण उभे करावे. राज्‍यातील विद्यापीठांनी एनआयआरएफ रॅकिंग मध्‍ये अव्‍वल स्‍थान मिळवण्‍याकरिता प्रयत्‍न करावे. विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वागीण विकासाकरिता विद्यापीठांनी कार्य करावे. विद्यार्थ्‍यांना नोकरीसाठी, संशोधनासाठी, विदेशात जाण्‍यासाठी परिक्षेचे निकास ३० दिवसाच्‍या आत विद्यापीठांनी काटेकोरपण लावण्‍याच्‍या सुचना केल्‍या.

बैठकीमध्‍ये विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेवर लावणे, सीएसआर फंड मधुन जास्‍तीत जास्‍त निधी मिळविणे, नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणांची येत्‍या शैक्षणिक सत्रापासुन अंमलबजावणी करणे, सर्व परीक्षांच्‍या पदवी व गुणपत्रिका नॅड पोर्टलवर अपलोड करणे, उद्योग व संस्‍थामध्‍ये समन्‍वय, विद्यापीठाचे मानांकन, भारतीय ज्ञान पध्‍दतीने एकीकरण, स्‍वंयम अभ्‍यासक्रम लागु करणे, विद्यार्थ्‍यांना इंटरशिपची सुविधा उपलब्‍ध करून देणे, प्रत्‍येक विद्यापीठ व महाविद्यालयात संशोधन व विकास कक्षाची स्‍थापना करणे, इ-समर्थची काटेकोरपणे अंमलबजावणी आदी बाबींवर बैठकीत सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. राष्ट्रीय धोरणाच्या तयारीचा आढावा व विद्यापीठाशी निगडित सामायिक विषयांवर यावेळी चर्चा झाली. केंद्र शासनाच्या योजना, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविलेल्या योजना, संशोधन प्रकल्प आदी विविध बाबींचा आढावा त्यांनी घेतला.

बैठकीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. सुभाष चौधरी, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ मधुसूदन पेन्ना, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु मा डॉ. एस. आर. गडाख, गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रशांत सोकारे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रमोद येवले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. उदय भोसले, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा आदी उपस्थित होते.